हायकोर्ट : माजी मंत्री शांताराम पोटदुखे यांचा अवमाननागपूर : माजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांना अपमानास्पद वागणूक देणे व अन्य विविध बेकायदेशीर कृत्यांचा आरोप असलेले चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक राजीव जैन यांची विशेष पोलीस महानिरीक्षकांमार्फत चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत. चौकशी अहवाल सादर करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल यांना गेल्या ४ फेब्रुवारी रोजी तडीपारीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल करून जैन यांच्यावर विविध आरोप केले आहेत. नोटीसमध्ये जयस्वाल यांच्याविरुद्ध दाखल विविध गुन्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. काही गुन्ह्यांचे खटले प्रलंबित असून काही गुन्ह्यांतून त्यांना आरोपमुक्त करण्यात आले आहे. यामुळे त्यांना तडीपार केले जाऊ शकत नाही, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. जयस्वाल यांच्यावर पोलिसांचा राग आहे. ते जयस्वाल यांना धडा शिकविण्याची संधी शोधत होते. गेल्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात जैन यांनी पोटदुखे यांचा अवमान केला होता. यामुळे जयस्वाल यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांनी जैन यांच्यासोबत वाद घातला होता. परिणामी जयस्वाल यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
चंद्रपूर पोलीस अधीक्षकांच्या चौकशीचे आदेश
By admin | Published: November 14, 2014 12:47 AM