नागपूर : पाच वर्षांअगोदर पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी मिळणार नसल्याचा दिलेला निरोप... लक्ष्मीनगर चौकातील एका नामांकित हॉटेलसमोर मध्यरात्रीच्या सुमारास अस्वस्थ मनाने मारलेल्या येरझाऱ्या अन् त्यानंतर राजकीय कारकीर्द संपली असाच अनेकांचा सूर. मात्र, मनातील ती खंत त्या क्षणापुरतीच ठेवत पक्ष नेतृत्त्वाच्या निर्देशांनुसार परत कामाला लागले आणि संयमाने राजकीय वाटचाल परत सुरू केली. त्यानंतर विधानपरिषदेत एन्ट्री, पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद आणि आता त्याच कामठी मतदारसंघातून परत उमेदवारी असा चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रवास राहिला आहे.
लहान-सहान कारणावरून आक्रस्ताळेपणा करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांसारखे न वागता राजकीय संयम बाळगल्याचे बावनकुळे यांना फळ मिळत असल्याचीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपने रविवारी विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. बावनकुळे यांच्याकडे राज्याची जबाबदारी असल्यामुळे ते ही निवडणूक लढतील की नाही, याबाबत शंका होती. परंतु, सावरकर यांनी ‘लाडकी बहीण’संदर्भात केलेल्या जुगाडाबाबतचे वक्तव्य राजकीय वातावरण तापविण्यास पुरेसे ठरले होते. यावरून त्यांच्याविरोधात पक्षात नाराजीचा सूर होता. पक्षाच्या केंद्रीय पातळीवरून सर्वेक्षणाच्या आधारे कामठीत विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांच्याऐवजी चंद्रशेखर बावनकुळे यांनीच रिंगणात उतरावे, अशी सूचना करण्यात आली. त्याआधारे बावनकुळे यांचे नाव जाहीर झाले.
आता पुढील महिनाभर बावनकुळे यांच्यावरील जबाबदारी तिपटीने वाढली आहे. प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांना राज्यातील प्रत्येक मतदारसंघावर बारीक नजर ठेवत उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या प्रचाराचे नियोजन करायचे आहे. सोबतच महायुतीतील इतर घटक पक्षांसोबतही समन्वय साधायचा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या उमेदवारीमुळे कामठीतील जागा आता ‘हायप्रोफाइल’ झाली आहे. त्यामुळे तेथे चांगली कामगिरी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे. यात ते वेळेचे गणित कसे साधतात, यावर बरेच काही अवलंबून असेल.
पक्षाने दिलेली जबाबदारी सर्वोपरी : बावनकुळे
केंद्रीय निवडणूक समितीतील सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, याचे समाधान आहे. कामठीतून मी तीन वेळा निवडणूक जिंकलो आहे. तेथील मतदारांमुळेच मला आत्मविश्वास मिळतो. आम्ही विकासाच्या उद्दिष्टानेच कार्य करत असून, पक्षाने दिलेली जबाबदारीच माझ्यासाठी सर्वोपरी आहे, अशी भावना बावनकुळे यांनी व्यक्त केली.