लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फडणवीस यांनी एकच बॉम्ब फोडला असून, त्यांच्याकडे असे अनेक शस्त्र आहेत. येणाऱ्या काळात ते बाहेर निघतील, असा दावा भाजपा प्रदेशचे सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे. पोलिसांच्या बदली संदर्भातला अहवाल लिक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चौकशीची नोटीस पाठवली. याच्या निषेधाार्थ रविवारी व्हेरायटी चौकात नोटिसीची होळी करण्यात आली. त्यावेळी आ. बावनकुळे बोलत होते.
महाराष्ट्र अशांत करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा घाट आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांची चौकशी करायची सोडून राज्य सरकारने आमचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस पाठवली, हे कृत्य चुकीचे आहे. पोलिसांनी तात्काळ नोटीस परत घ्यावी, अशी मागणी आ. बावनकुळे यांनी यावेळी केली.
या आंदोलनाला प्रामुख्याने खा. विकास महात्मे, माजी मंत्री अनिल बोन्डे, भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके, नागपूर ग्रामीण अध्यक्ष अरविंद गजभिये, आ. कृष्णा खोपडे, माजी आमदार सुधीर पारवे, माजी आमदार गिरीश व्यास, डॉ. राजीव पोतदार, अविनाश खळतकर, पारेन्द्र पटले, आदर्श पटले, विशाल भोसले, संजय फांजे उपस्थित होते.