नागपूर : राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला होता. व आता कर्नाटक सरकारला आदेश देऊन त्यांनीच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अभ्यासक्रमातला धडा उडवून टाकायला लावला. काँग्रेसने कर्नाटकात धर्मांतरण बंदी कायदा रद्द केला आहे. पुढे ते गोहत्या बंदीचा कायदा ही रद्द करतील. काँग्रेसला दिलेलं मत देशामध्ये अराजकता निर्माण करू शकतं, कर्नाटक याचं उदाहरण आहे अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलीय. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे बावनकुळे म्हणाले. काँग्रेसच्या धोरणाला पाठिंबा देत उद्धव ठाकरे भविष्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार आहेत का? हे त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगावे. सत्तेपासून पैसा व पैश्यापासून सत्ता असा काँग्रेस व राष्ट्रवादीचं इतिहास राहिलाय त्यांनी या सरकारवर आरोप करणं यावर उत्तर योग्यवेळी देण्यात येईल, असंही ते म्हणाले.
आशिष देखमुखांना यामुळे काढून टाकले..
आशिष देशमुखांनी ओबीसीविरोधी भूमिका असलेले राहुल गांधी यांच्यावर टीका केली आणि त्यामुळे नाना पटोले यांनी त्यांना काढून टाकलं. ओबीसीच्या संदर्भाने बाजू मांडणे हे जर काँग्रेसमध्ये चुकीचे असेल तर आणि ओबीसीसंदर्भात मत मांडल्यानंतर त्यांना काढून टाकण्यात येत असेल तर काँग्रेस ओबीसीविरोधी आहे.
जाहिरातीवर स्पष्टीकरण
कुणीतरी एक जाहिरात दिली. त्यावरून काही चर्चा तयार झाली त्यावर भावना व्यक्त झाल्या. देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे हे दोघेही प्रगल्भ नेते आहेत. त्यांना महाराष्ट्राचं हीत कळतं. महाराष्ट्र एक नंबरवर आणण्यासाठी ते लहान-सहान गोष्टींना थारा देणार नाहीत. अशा जाहिरातींमुळे कुणाचं मत कमी होत नाही, कुणाची उंची कमी होत नाही किंवा घटत नाही. आणि त्यामुळे अशा जाहिरातींमध्ये काही ठेवलं नाहीये. दोघही नेते ह्रदय आणि मनाने एक आहेत. राजकारणासाठी नव्हे तर दोघेही नेते महाराष्ट्राला क्रमांक एक करायच्या विचाराने एक आले आहेत, असे बावनकुळे म्हणाले. यासह तेलंगणामधील बीआरएसच्या मॉडेलमध्ये किती चुका आहेत, याची एक चित्रफित आम्ही लवकरच सर्वांसमोर आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.