नागपूर : कोळसा टंचाईमुळे नव्हे, तर राज्य सरकारकडे पैसा नसल्यानं वीज संकट आलं असल्याचा आरोप माजी ऊर्जामंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर केला आहे. कोळसा कंपन्यांना २८०० कोटी रुपये सरकारनं दिलेले नाहीत त्यामुळे, वीजेसाठी कोळसा कसा मिळेल असा प्रश्न बावनकुळे यांनी केला आहे.
देशभरातील औष्णिक वीज केंद्रात कोळशाचा तुटवडा असून महाराष्ट्रातील परिस्थिती मात्र आणखी भयावह झाली आहे. ‘महाजेनको’च्या वीज केंद्रांमध्ये आता दोन दिवस पुरेल इतकाही कोळसा शिल्लक नाही. यावर बोलताना, सरकार आणि वीज पुरवठा करणाऱ्या तिन्ही कंपन्यांमध्ये काहीच ताळमेळ नसल्यानंच राज्यावर ही वेळ आल्याची टीकाही बावनकुळे यांनी केली.
कोळसा लिफ्टींगची परवानगी न दिल्याने ही वेळ राज्यावर आली आहे. ऊर्जा विभागाने कोळशाचे योग्य नियोजन केलं नाही. कोळशाचा पुरेसा साठा न केल्याने ही वेळ आली आहे. महाजनकोकडे कंत्राटी कामगारांचे पगार द्यायला पैसे नाही. गरज भासल्यास मुख्यमंत्री, अर्थमंत्र्यांनी महाजेनकोला ४-५ हजार कोटी रुपये द्यावे, हवं तर कर्ज घ्यावं, असा सल्लाही बावनकुळे यांनी दिला आहे.