नागपूर : उद्धव ठाकरे यांच्या पक्षात हुकूमशाही तयार झाली होती. त्यांच्या वागणुकीमुळे आमदार त्यांच्यापासून वेगळे झाले. उद्धव ठाकरे हे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री होते. अडीच वर्षांत काहीही न करणारे उद्धव ठाकरे यांनी आता काही बोलणे हे विनोद करण्यासारखे आहे, या शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. नागपुरात ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यपाल यांच्या शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्याचे कुणीच समर्थन करत नाही. मात्र राज्याच्या राज्यपालांवर उद्धव ठाकरे यांनी जे भाष्य केले ते योग्य नाही. राज्यपालांची वृद्धावस्था काढणे त्यांना शोभत नाही. शरद पवार यांच्याकडून वैयक्तिक टीकेची अपेक्षा नाही आहे. त्यांनीदेखील या प्रकरणात वक्तव्य करून स्वत:ची प्रतिमा खराब केली आहे, असेदेखील ते म्हणाले.
अजित पवार यांना शेतकऱ्यांवर बोलण्याचा अधिकार नाही
यावेळी बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावरदेखील टीका केली. पवार बांधावर जाऊन पैसे देणार होते. मात्र असे तर त्यांनी केलेच नाही. शिवाय विदर्भ वैधानिक विकास मंडळ बरखास्त केले. त्यांना शेतकऱ्यांबाबत बोलण्याचा अधिकारच नाही.