कोराडी (नागपूर) : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात पुन्हा केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा भाजपतर्फे निषेध करण्यात आला. भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात रविवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी पटोलेंच्या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त केला.
पटोले यांनी पंतप्रधानांच्या पत्नीचा संदर्भ देऊन केलेल्या विधानामुळे देशातील सर्व महिलांचा अपमान झाला आहे. महिला हा अपमान कदापि सहन करणार नाही. नाना पटोले यांचे मानसिक संतुलन ढासळले असून त्यांना मनोरुग्णालयात दाखल करावे, या शब्दांत बावनकुळे यांनी पटोले यांच्यावर टीका केली. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांविरोधात भाजपच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन केले जाणार आहे. तसेच आम्ही काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडेही तक्रार करू, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
काय म्हणाले होते नाना पटोले? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांशी बोलताना ‘मी मोदीला मारू शकतो, शिवीगाळही करू शकतो’, असं म्हटलं होतं. त्यानंतर नाना पटोले यांनी मी संबंधित विभागातील मोदी नावाच्या गावगुंडाबाबत बोलत होतो असं स्पष्टीकरण दिलं होतं. पटोलेंच्या एका विधानानं वादळ निर्माण झालेलं असतानाच त्यांनी काल इगतपुरीमध्ये आणखी वादग्रस्त विधान केलं.
'ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरते', असं विधान नाना पटोले यांनी काल केलं. इगतपुरी येथे मुंबई प्रदेश काँग्रेसचे तीन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली होती. नाना पटोलेंच्या विधानानंतर राज्यभर भाजपकडून जोरदार निदर्शनं केली जात आहेत.