नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण तापलं असून त्यांच्या पदमुक्तीची मागणी होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
बावनकुळे म्हणाले, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. भगत सिंह कोश्यारी यांना ठेवायचं की नाही हा अधिकार आम्हाला नाही. ज्यांना अधिकार आहे ते निर्णय घेतील. उदयनराजे असो किंवा आम्ही आमची सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही. पण, त्यादिवशी राज्यपालांची चूक झाली, असं म्हणत त्यांना ठेवायचे की नाही ठेवायचे हा आमचा अधिकार क्षेत्र नाही, असे बावनकुळे म्हणाले.
पीक विम्यावरून महाविकास आघाडीवर टीका
महाविकास आघाडी सरकारने विमा कंपन्यांना पैसे दिले, मात्र अडीच वर्षे कधीही आढावा घेतला नाही. कोणत्याही पालकमंत्र्यांनी, कृषीमंत्र्यांनी आढावा घेतला नाही. खरिपाच्या आढावा बैठकदेखील त्या काळात झाल्या नाहीत, अशी खोचक टीका बावनकुळे यांनी केली. पीक विमा कंपन्या सरकारकडून पैसे घेत होत्या. मात्र खरोखर शेतकऱ्यांना त्यांनी परतावा दिला की नाही हे पाहण्याकडे कोणाचंही लक्ष नव्हतं. मविआ सरकारच्या काळात विमा कंपन्यांवर कोणाचंही नियंत्रण नव्हतं. म्हणून विमा कंपन्यांनी त्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर पैसे खाल्ले. हे मागच्या मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे. मविआ सरकारच्या काळात विमा कंपन्यांच्या प्रकरणात जो भ्रष्टाचार झाला आहे, त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी आपली मागणी असल्याचे बावनकुळे म्हणाले.