नागपूर : गडकरी-फडणवीस-बावनकुळे यांच्या बालेकिल्ल्यातील नागपूर शिक्षक मतदारसंघाची जागा भाजप हरली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही जागा भाजप लढली असती तर निकाल वेगळा असता, अशी प्रतिक्रिया देत हे अपयश भाजपचे नसल्याची भूमिका मांडली आहे.
बावनकुळे म्हणाले, शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांच्या दोन टर्म पूर्ण झाल्या होत्या. त्यामुळे यावेळी शिक्षक परिषदेने भाजपचा उमेदवार लढवावा, असा प्रस्ताव होता. मात्र, परिषदेने आधीच गाणार यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर भाजपने गाणार यांना पाठिंबा जाहीर केला. भाजपच्या प्रत्येक नेता व कार्यकर्त्याने परिश्रम घेतले. पण यश आले नाही याचे दु:ख आहे. या निकालावर पक्ष मंथन करेल, असेही त्यांनी सांगितले.
येत्या काळात असाच निकाल दिसेल : केदार
- शिक्षक मतदारसंघातील सुधाकर आडबाले यांचा विजय हा महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी एकोप्याने केलेल्या मेहनतीचा परिणाम आहे. शिक्षकांच्या रूपातील सुशिक्षित मतदाराने भाजपला सपशेल नाकारले आहे. सामान्य जनतेतही भाजपबद्दल असाच रोष आहे. येत्या काळातसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात अशाच प्रकारचे निकाल दिसेल, अशी सूचक प्रतिक्रिया काँग्रेस नेते माजी मंत्री आ. सुनील केदार यांनी दिली.