नागपूर : चंद्रयानाचे अंतर जसजसे कमी होत होते तसतेस नागपूरकरांच्या ह्रदयाचे ठोके वाढत होते. चंद्रयान २०० मीटरवर आल्यानंतर सेकंदा सेकंदाला काऊंटडाऊन सुरू झाला आणि जसे चंद्रयान लॅण्ड झाले, तसाच नागपुरात दणक्यात बॅण्ड वाजला. लक्ष्मीनगर चौकात चंद्रयान-३ चे लाईव्ह प्रेक्षपण भव्य स्क्रीन लावून करण्यात आले होते. या सूवर्णक्षणाची अनुभूती घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागपूरकर एकत्र आले होते.
चरैवेति फाउंडेशन तर्फे चंद्रयान-३ च्या यशस्वी लॅण्डींगचा आनंद सादरा करण्यासाठी जल्लोष सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात तरुणाई उपस्थित होती. हातात तिरंगा आणि मुखातून ‘भारत माताची की जय’ चा जयघोष होत होता. सेलिब्रेशनची संपूर्ण तयारी झाली होती. फक्त चंद्रयानाचे लॅण्ड होणे बाकी होती. हे यान जसे खाली खाली येत होते, तसा उपस्थितांमध्ये उत्साह संचारत होता. लॅण्ड झाल्या झाल्याच दणक्यात ढोल ताशे वाजले, भारत माता की जय चा गजर आणखी जोरात निनादला, फटाक्यांची आतषबाजी झाली आणि ढोल ताश्यांच्या आवाजावर तरुणाई बेधुंद थिरकायला लागली. चंद्रयान -३ मोहीम यशस्वी झाल्याने १४० कोटी जनतेच्या स्वप्नांची पूर्ती झाल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.
- प्रत्येक नागरिकासाठी हा आनंदाचा क्षण आहे
रुची ठाकुर, रोली पाठक, गौरी वेळेकर, सानिका जोशी या महाविद्यालयीन तरुणी अतिशय बेधुंद होवून थिरकत होत्या. या तरुणी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाल्या की भारतासाठी हा सुवर्ण क्षण आहे, ही देशासाठी अभिमानाची बाब आहे, प्रत्येक नागरीकांनी हा आनंद साजरा केला पाहिजे, कारण भारतीय शास्त्रज्ञांनी विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.