चंद्रपूर - विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील वीज उपकेंद्रात लागलेल्या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात आले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडवाजण्याच्या सुमारास उपकेंद्रात भीषण आग भडकली. नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील वरोरा येथील 220 केव्ही वीज उपकेंद्रात ही आग लागली होती. या आगीमुळे महापारेषणचं मोठं नुकसान झालं आहे.
आग लागल्यानंतर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्यामुळे संपूर्ण परिसर हादरला. एक ते दीड किलोमीटरच्या पट्ट्यात या स्फोटाचे आवाज ऐकू आले. काही किलोमीटर अंतरावरुनही या आगीचे आकाशात उठणारे लोळ दिसत होते. आग लागलेल्या वीज उपकेंद्राच्या शेजारी 440 केव्हीचे आणखी एक वीज केंद्र आहे.
वेळीच आग विझवण्यासाठी पावले उचलण्यात आल्यामुळे सुदैवाने ही आग त्या वीज केंद्रापर्यंत पोहोचली नाही. या आगीमुळे परिसरातील 35 गावांचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. हा वीज पुरवठ सुरळीत होण्यासाठी आणखी एक दिवस लागेल अशी माहिती आहे.