लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजचा सिनेमा फार सोपा झालाय. तांत्रिक विकासासोबतच व्हॅनिटी व्हॅनसारख्या हव्या त्या भौतिक सुविधाही क्षणात उपलब्ध होत आहेत. आमच्या काळात सिनेमा म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे कठीण काम होते. आम्ही अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम केले़ व्हॅनिटी व्हॅन तर फार दूरची गोष्ट. साधे कॉस्च्युम बदलयायचे असले तरी झाडाचा आडोसा शोेधावा लागायचा. पण, आव्हानांचा सामना करण्यातही एक वेगळाच आनंद होता, अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेत्री पद्मभूषण वहिदा रहमान यांनी त्यांच्या आयुष्यातील रुपेरी आठवणींचा पट उलगडला. प्रसिद्ध चित्रपट, संगीत समीक्षक व ९२.७ बिग एफएमच्या इंटरटेनमेंट एडिटर पद्मश्री भावना सोमय्या यांनी पाचव्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार वितरण समारंभात गाईड, प्यासा, चौदहवी का चाँद, नीलकमल, पत्थर के सनम, साहब बीबी और गुलाम यासारख्या अजरामर चित्रपटांना आपल्या अभिनयाचा साज चढविणाऱ्या पद्मभूषण वहिदा रहमान यांची मुलाखत घेतली. वयाच्या १६ व्या वर्षी तुम्ही सीआयडी हा पहिला चित्रपट केला. त्यावेळची मनोवस्था कशी होती या प्रश्नावर वहिदा म्हणाल्या, कोलकात्यात रात्रीचे शूटिंग सुरू होते़ अत्याधिक श्रमाने थकून जायचे. थोडासाही ब्रेक मिळाला की आईच्या मांडीवर डोके ठेवून झोपून जायचे. शॉट रेडी झाला की मग असिस्टंट डायरेक्टर डोळ्यावर पाणी मारून मला उठवायचे. चित्रपट रिलीज झाल्यावर हेच शॉट्स मी पडद्यावर बघितले अन् मला हसू आले. कारण, सेटवर सतत झोपणारी मी स्क्रीनवर मात्र सुंदर दिसत होती. भूमिकांची निवड कशी करायचे हे सांगताना त्या म्हणाल्या, मी कथेला प्राधान्य दिले. मला देवावर विश्वास होता अन् माझे नशीब चांगले होते. त्यामुळेच माझे अनेक चित्रपट गाजले. गाईडच्या वेळी अनेकांनी हा चित्रपट न करण्याचा सल्ला दिला. कारण यात माझी भूमिका नकारात्मक होती़ पण, नव्या भूमिका, नवे विषय स्वीकारण्याकडे माझा कल होता. मी ती भूमिका स्वीकारली आणि गाईडची रोजी अजरामर झाली, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.५० वर्षांनंतर नागपुरात पाऊलपंडित जवाहरलाल यांच्या उपस्थितीत ५० वर्षांआधी नागपुरात काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. तेव्हा मी पहिल्यांदा या शहरात आले व आता ५० वर्षांनंतर दुसºयांदा येतेय. येथील संत्री मला जाम आवडतात, असे त्यांनी आवर्जून सांगितले.गुरू दत्त की देव आनंद?या मुलाखतीत लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी प्रेक्षकांमधून वहिदा रहमान यांची परीक्षा घेणारा प्रश्न विचारला. गुरू दत्त आणि देव आनंद या दोन्ही नायकांसोबत तुमची जोडी खूप गाजली. पण, यापैकी तुमचा सर्वात आवडता नायक कोण, असा त्यांचा प्रश्न होता. या प्रश्नाचा अन्वयार्थ वहिदा यांच्या लक्षात आला आणि त्यांनी अतिशय चाणाक्ष उत्तर दिले. त्या म्हणाल्या, गुरू दत्त नायक कमी आणि दिग्दर्शक जास्त होते. त्यामुळे ते फारसे कुणात रमायचे नाही. देव आनंद मात्र मस्तमौला होते. पण, या दोघातही एक साम्य होते. त्यांनी कधीच कुणाची ईर्र्ष्या केली नाही.लेमन ट्रीच्या हेरिटेज दर्जासाठी सहकार्य करानिम फाऊंडेशनतर्फे आम्ही लेमन ट्रीला हेरिटेज दर्जा लाभावा यासाठी प्रयत्न करीत आहोत. याबाबत एक निवेदन राष्ट्रपतींनाही देणार आहोत. लेमन ट्रीचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे नागपूरकांनीही आमच्या या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन वहिदा रहमान यांनी या मुलाखतीत केले.
झाडाच्या मागे कॉस्च्युम बदलावे लागायचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 8:12 PM
आम्ही अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम केले़ व्हॅनिटी व्हॅन तर फार दूरची गोष्ट. साधे कॉस्च्युम बदलयायचे असले तरी झाडाचा आडोसा शोेधावा लागायचा. पण, आव्हानांचा सामना करण्यातही एक वेगळाच आनंद होता, अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेत्री पद्मभूषण वहिदा रहमान यांनी त्यांच्या आयुष्यातील रुपेरी आठवणींचा पट उलगडला.
ठळक मुद्देपद्मभूषण वहिदा रहमान यांनी उलगडला रुपेरी आठवणींचा पट