लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने ई-वे बिल मसुद्यात बदल करून मालाच्या ये-जाकरिता ई-वे बिलाची मर्यादा ५० हजारांऐवजी ३ ते ५ लाख करण्याची मागणी फेडरेशन आॅफ असोसिएशनचे (फॅम) अध्यक्ष विनेश मेहता यांनी केली.नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनच्यावतीने व्यापाऱ्यांची राज्यस्तरीय आघाडीची संघटना फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र, (फॅम) मुंबईच्या पदाधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी रामदासपेठ येथील हॉटेलमध्ये चर्चासत्र पार पडले. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. मंचावर फॅमचे उपाध्यक्ष प्रदीप पंजवानी, नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनचे सचिव शिव प्रताप सिंह उपस्थित होते.ई-वे बिलाची मर्यादा ५ लाख करामेहता म्हणाले, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये ई-वे बिलांतर्गत मालाच्या वाहतुकीची मर्यादा १ लाखांपेक्षा जास्त आहे. तर महाराष्ट्रात ५० हजार आहे. ही मर्यादा किमान ५ लाख रुपये करावी. यावर शासनासोबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे लहान व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल. याचप्रमाणे एमपीएमसीमध्ये सेस संपविण्यासाठी शासनासोबत बातचित सुरू आहे.मेहता म्हणाले, जीएसटी लागू झाल्यानंतर व्यापाऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत नाही. पण सरकार आणि अधिकाऱ्यांना त्रास होत आहे. भविष्यात जीएसटी उत्तम प्रणाली ठरणार आहे. जीएसटीमधील अनेक त्रुटी दूर करण्यात येत आहे. ही चांगली गोष्ट आहे. सध्या वॉलमार्टच्या भारतात प्रवेशाचे मोठे संकट आहे. व्यापारी त्याचा एकजुटीने विरोध करतील.हरीश कृष्णानी म्हणाले, जीएसटीमुळे देशात मंदीचे वातावरण आहे. सरकारने त्यात आमूलाग्र बदल करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा. फॅमचे नवनियुक्त उपाध्यक्ष प्रदीप पंजवानी म्हणाले, व्यापारी सरकारी धोरणाने आणि जीएसटीमुळे त्रस्त आहे. व्यापाऱ्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. व्यापाऱ्यांनी व्यवसाय करावा की कागदपत्रे सांभाळावीत, यावर संभ्रम आहे.फॅमचे संस्थापक उपाध्यक्ष कैलाशचंद्र अग्रवाल म्हणाले, जीएसटीमुळे लहान-मोठे उद्योग बंद झाले आहेत. आता वॉलमार्टचे संकट आहे. व्यापाऱ्यांना आता सतर्क राहण्याची गरज आहे.संचालन सचिव शिवप्रताप सिंह यांनी केले. मेहता यांनी कैलास अग्रवाल आणि नीलेश सूचक यांना आमंत्रित सदस्य बनण्याचे आमंत्रण दिले. या प्रसंगी ‘फॅम’चे वरिष्ठ उपाध्यक्षद्वय विजय भुता, राजेश शाह, सचिव आशिष मेहता, जितेंद्र शाह, भालचंद्र कटारिया, विशेष आमंत्रित नरसिंगमल जैन, हरीश कृष्णाणी, प्रकाशचंद्र गोयल, शिवप्रताप सिंह, प्रमोद सेदानी, हरीश फुलवानी, गुलशन साजनानी, नरेश ग्यामलानी, रामदास वजानी, जगदीश बसरानी, भंवरलाल जैन, अशोक चावला, जवाहरलाल गुप्ता, नितीन सूचक, अशोक वाधवानी, कैलासचंद्र अग्रवाल, नीलेश सूचक, ललितकुमार कोठारी, मयूर पंचमतिया, गोविंद मंत्री, राजेंद्रप्रसाद बैद, चंदुमल आमेसर, गोविंद बजाज, अर्जुनदास आहुजा, घनश्यामदास छाबरिया, सुनील बजाज, पवन अग्रवाल, सुभाष अग्रवाल, पुनीत कुसुमगर, संजय खुळे प्रामुख्याने उपस्थित होते.