आॅनलाईन लोकमतनागपूर : जागतिक तापमानातील वाढ तसेच वातावरण बदलाच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची संयुक्त समिती गठित करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.सदस्य हेमंत टकले यांनी नियम ९७ अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना कदम म्हणाले, वातावरण बदलाचा विषय व्यापक आहे. त्यावर विस्तृत चर्चा होण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने विधिमंडळ सदस्यांची समिती स्थापन करण्यात येईल. वातावरण बदलाच्या अनुषंगाने उपाययोजनाबाबत बोलताना आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत म्हणाले की, पर्यावरण बदलामुळे समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होण्याचा धोका अभ्यासकांकडून वर्तविण्यात येत आहे. प्रदूषणामुळे स्वाईन फ्लूच्या विषाणूंची तसेच डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूवरील लसीवर दरवर्षी संशोधन करून आंतरराष्ट्रीय बाजारातून मागवावी लागते. सध्या होत असलेल्या प्रदूषणावर उपाययोजना करण्याची गरज असून कार्बन क्रेडिटचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे. घर अथवा इतर ठिकाणातून बाहेर पडताना रेफ्रिजरेटर, ए.सी. बंद करून बाहेर पडणे गरजेचे आहे. यामुळे तापमानवाढीवर काही प्रमाणात नियंत्रण आणता येईल.पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील म्हणाले की, हरितगृह वायूंमुळे वातावरणातील उष्णता रोखून ठेवली जाते. मोठ्या शहरात प्रदूषणही वाढत आहे. त्यादृष्टीने मोठ्या शहरातील घनकचरा व्यवस्थापन तसेच बायोमेडिकल वेस्टचे व्यवस्थापन करण्यासाठी निधी राखून ठेवण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.शहरातील लोकसंख्या वाढत आहे. घनकचऱ्याची विल्हेवाट कशी लावणार असा प्रश्न शेकापचे जयंत पाटील यांनी उपस्थित केला. डॉ. नीलम गोऱ्हे , हुस्नबानू खलिफे, विद्या चव्हाण आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
वातावरण बदल; उपाययोजनासाठी विधिमंडळ सदस्यांची समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 7:06 PM
जागतिक तापमानातील वाढ तसेच वातावरण बदलाच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची संयुक्त समिती गठित करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
ठळक मुद्देविधान परिषद : पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची माहिती