योगेश पांडे - नागपूर, लोकमत न्यूज नेटवर्क : गणेशोत्सवानिमित्त मंगळवारी चितारओळी परिसरात दिवसभर भक्तांची गणेशमूर्ती घेण्यासाठी गर्दी लोटणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे नियंत्रण करण्याचे मोठे आव्हान वाहतूक पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी कोंडी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल केला असून काही रस्त्यांवर ‘वन वे’ तर काही ठिकाणी ‘नो एन्ट्री’ करण्यात आली आहे.
चितारओळी परिसरात गणेशमुर्ती तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालते. भाविक मंगळवारी सकाळपासूनच तेथे येतील व सायंकाळनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्तेदेखील मूर्ती घेऊन जातील. त्यामुळे बडकस चौक, भावसार चौक, चितारओळ चौक या परिसरात मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यातच येथील मार्ग अरुंद असल्याने वादाचेदेखील प्रसंग उद्भवतात. वाहतूक सुरळीत राहावी व नागरीकांना गैरसोय किंवा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक पोलीस उपायुक्त चेतना तिडके यांनी निर्देश जारी केले आहेत. मंगळवारी सकाळी सहा वाजतापासून ते बुधवारी सकाळी सात वाजेपर्यंत हे नियम लागू राहतील. तसेच आवश्यक परिस्थितीनुसार वेळेवर योग्य मार्गाने वाहतूक वळविण्याचे अधिकार कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.अशी असेल वाहतूक- बडकस चैकाकडून चितार ओळी मार्गे भावसार चौकाकडे जाणारी एकेरी वाहतूक सूरू ठेवून भावसार चौक ते चितार ओळी मार्गे बडकस चौक अशी वाहतूक बंद करण्यात आली आहे.-भावसार चौकाकडून चितार ओळी मार्गे जाणारी वाहतूक भावसार चौक ते गांधी पुतळा चौक मार्गे बडकस चौकाकडे वळविण्यात येईल.-बडकस चौक ते शहिद चौक व शहिद चौक ते बडकस चौकाकडे जाणारी वाहतूक गांधीपुतळा चौक येथून बंद करण्यात येईल. तसेच बडकस चौकाकडून येणारी वाहतूक अग्रसेन चौकाकडे व शहिद चौकाकडून येणारी वाहतूक दारोडकर चौकाकडे वळविण्यात येणार आहे.पोलिसांचा बंदोबस्तदरम्यान, या परिसरात पोलिसांचादेखील बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुठलीही अनुचित घटना होऊ नये यासाठी साध्या वेशातील पोलीसदेखील राहणार आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून या परिसरावर नजर राहणार आहे.