लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शनिवारी सायंकाळी वातावरण बदलताच वादळी पावसाने शहरातील वीज वितरण यंत्रणेचे तीनतेरा वाजवले. शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा ठप्प पडला. काही ठिकाणी वीज कर्मचाऱ्यांनी अनेक तासांच्या प्रयत्नानंतर पुरवठा सुरळीत केला. तर काही भागात रात्री उशिरापर्यंत वीज नव्हती.सायंकाळी ५ वाजता वातावरण अचानक बदलताच वीज जायला सुरुवात झाली. एकेक करीत अनेक भागातील वीज बंद पडत होती. वीज गेल्याच्या जवळपास ५०० पेक्षा अधिक तक्रारी दाखल झाल्या. वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलच्या भागातील ११ फीडर बंद पडल्याने २५ हजार वीज ग्राहकांना फटका बसला. बेसा सब स्टेशनपासून निघणारे फीडर सर्वात अगोदर बंद पडले. याशिवाय गोधनी, गोरेवाडा, एस.टी. स्टॅँड, गांधीबाग, गोविंद भवन, छावनी, एएफओ फिडरशी जुळलेल्या ग्राहकांची वीज गेली. गोरेवाडा व गोधनीमध्ये विजेच्या तारांवर झाड कोसळले. शास्त्रीनगरात दोन विजेचे खांब कोसळून पडले. एसएनडीएलनुसार काही फीडर वादळी वाऱ्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने बंद करून सायंकाळी ६.३० वाजता वीज पुरवठा सुरुळीत करण्यात आला. वंजारीनगर, अंबाझरी, हिवरीनगर, हिवरी ले-आऊट या भागातही काही लोकांच्या घरी रात्री उशिरापर्यंत वीज नव्हती. दुसरीकडे महावितरणच्या क्षेत्रातही चार फीडर प्रभावित झाले. यात अलंकार व हॅम्पयार्ड फीडरचा समावेश आहे. काँग्रेसनगर डिव्हिजनचे कार्यकारी अभियंता कुंदन भिसे यांनी युद्धस्तरावर मान्सूनपूर्व तयारी करण्यात आल्याने मोठे नुकसान झाले नसल्याचा दावा केला आहे. असे असले तरी एसएनडील व महावितरणच्या भागातील अनेक ग्राहकांच्या विजेसंबंधीच्या व्यक्तिगत तक्रारी रात्री उशिरापर्यंत सुरूच होत्या.२५ हजार कुटुंब १७ तास अंधारातमहापारेषणच्या १३२/३३ केव्ही क्षमतेचे बेसा सबस्टेशन या आठवड्यात दुसऱ्यांदा शुक्रवारी रात्री १२.३० वाजता तांत्रिक कारणामुळे खराब झाले. त्यामुळे एसएनडीएलला वीज पुरवठा करणारी यंत्रणा अचानक ठप्प पडली. दिघोरी, जानकीनगर आणि हुडकेश्वर फीडरशी जुळलेल्या २५ हजार घरांमधील वीज पुरवठा ठप्प झाला. उष्णतेमुळे इतर फीडरही अधिक लोडवर होते. त्यामुळे या भागातील वीज दुसऱ्या फीडरशी जोडताही आली नाही. महापारेषणने ही दुरुस्ती शनिवारी सायंकाळी ५.२० वाजता ठीक केली. यानंतर एकेक करीत सर्व फीडर सुरू करण्यात आले. दरम्यान या भागातील नागरिकांना तब्बल १७ तास विजेशिवाय राहावे लागले.