लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या ‘पेट’ (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) नोंदणीसाठी प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. आता २४ एप्रिलऐवजी ८ मेपर्यंत ‘पेट’साठी अर्ज भरता येणार आहेत. कोरोनाची स्थिती पाहून पुढील तारखांची घोषणा करण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी स्पष्ट केले.
डॉ. आर.जी. भोयर व डॉ. पेशवे यांच्या अध्यक्षतेखालील दोन समित्यांनी पीएच.डी.च्या जाचक अटींमध्ये बदल करीत नवा शिफारशीचा समावेश केला होता. त्यानुसार विद्यापीठाने शिफारशी मान्य केल्या असून, पीएच.डी.संदर्भात अधिसूचना काढली. ‘रिसर्च मेथडॉलॉजी’ आणि ‘अॅप्टिट्यूड’वर भर देत विद्यापीठाने ‘पेट’च्या स्वरूपात बदल केला आहे.
अर्ज सादर करण्याची अखेरची तारीख २४ एप्रिल ही होती. मात्र कोरोनामुळे अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने वेळापत्रकात बदल केला आहे. ८ मेपर्यंत पेटसाठी अर्ज भरता येणार आहेत. तर हार्डकॉपी १५ मेपर्यंत विद्यापीठात सादर करता येणार आहे. पुढील वेळापत्रक कोरोनाची स्थिती पाहून घोषित करण्यात येईल, असे डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले.