लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारताचे संविधान हे कुणीही बदलू शकत नाही. तसा विचार करणे म्हणजे देशद्रोह ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले. ६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आयोजित मुख्य सोहळ्यात ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी नागपूरच्यावतीने शनिवारी ६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे ऊर्जा व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर नंदा जिचकार आदी यावेळी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रनिर्माते होते. त्यांच्या योगदानाला कुणीही विसरू शकत नाही. भारताला आज जगात बलशाली म्हणून पाहिले जात असेल तर ते केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच. संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले आहेत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञेतच बुद्धधम्माचा सार आहे. प्रज्ञा, शील करुणा हे मानवी मूल्य आहे. या मूल्यावर प्रत्येकाने चालण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी यावेळी विचार मांडले. प्रास्ताविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी केले. त्यांनी दीक्षाभूमी विकास प्रकल्पासाठी कृषी विभागाची आणि आरोग्य विभागाची जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली.यावेळी खा. कृपाल तुमाने, आ. प्रकाश गजभिये, आ. नाना शामकुळे, आ. डॉ. मिलिंद माने, विभागीय आयुक्त अनुप कुमार, मनपा आयुक्त अश्विन मुद्गल, कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम, स्मारक समितीचे मा.मा. येवले, अॅड. आनंद फुलझेले, एन.आर. सुटे, डॉ. सुधीर फुलझेले, प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार आदी उपस्थित होते. गायक राजेश बुरबुरे व त्यांच्या चमूने बुद्ध व भीमगीते सादर केली. कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदनेने झाली तर राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. संचालन समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी केले तर आभार डॉ. राजेंद्र गवई यांनी मानले.माझ्या जीवनावर बुद्ध विचारांचा प्रभावहातात तलवान न घेता जगाला जिंकण्याची किमया केवळ बुद्धाच्या विचारानेच केली आहे. बुद्धाचा विचारच आज जगाला तारू शकतो. मी स्वत: हिंदू धर्माला मानणारा असलो तरी, माझ्या जीवनावर बुद्धाच्या विचारांचा प्रभाव आहे. जगावर राज्य करायचे असेल तर बुद्धाचे विचारच महत्त्वाचे आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले....तर मी झेंडा घेऊन उभा : रामदास आठवले‘अब हमने ली है समता की शिक्षा, बदल देंगे हम समाज का नक्शा’ अशा शब्दात आपल्या भाषणाला सुरुवात करीत रामदास आठवले म्हणाले, तथागत बुद्धांचे विचारच पाली भाषेतून जगभरात पोहचले आहे. यामुळे भारतीय संविधानाच्या अनुसूची ८ मध्ये पाली भाषेचाही अंतर्भाव करावा, यासाठी माझे प्रयत्न असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलविण्याचा कुणी विचार करीत असेल किंवा कुणी आरक्षण बंद करण्याच्या भाषेचा वापर करीत असेल तर त्यांच्या विरोधात मी झेंडा घेऊन उभा असेल. हे सरकार दलितविरोधी नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुद्ध धम्माला मानतात, असेही ते म्हणाले.दीक्षाभूमीचा ‘मास्टर प्लॅन’ लवकरच कार्यान्वितदीक्षाभूमीचा मास्टर प्लॅन राज्य सरकारने तयार केला आहे. तो लवकरच कार्यान्वित केला जाईल. यात दीक्षाभूमी समोरील जागेचाही उपयोग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सोबतच १०० कोटी रुपयांचा बुद्धिस्ट सर्किटचाही प्लॅन तयार केला असून त्याला केंद्र सरकारची मंजुरी मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.आरक्षणाला धक्का लागणार नाही : नितीन गडकरीनितीन गडकरी म्हणाले, आरक्षण हटविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भविष्यात कुणालाही यासाठी झेंडा घेऊन उभे होण्याची गरजही पडणार नाही, हा विश्वास ठेवा, कारण आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रति कटिबद्ध आहोत. त्यांचे विचारच आमचे मिशन आहे. समता, बंधूत्व आणि न्याय याच आधारे देश निर्माण व्हावा, यासाठी पंतप्रधानांसह आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. नदी जोड प्रकल्प सरकारने हाती घेतला आणि तीन महिन्यात ५० हजार कोटी रुपयांच्या कार्याला सुरुवात होत आहे, त्याचे ‘व्हिजन’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून मिळाले याचा अभिमान आहे.
संविधान बदलणे म्हणजे देशद्रोह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 1:29 AM
भारताचे संविधान हे कुणीही बदलू शकत नाही. तसा विचार करणे म्हणजे देशद्रोह ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले.
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दीक्षाभूमीवर ६१ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा