नितीन गडकरी : आयएमएतर्फे ‘आॅर्गन डोनेशन हेल्पलाईन’ नंबरचे लोकार्पणनागपूर : अवयव दानाला घेऊन लोकांमध्ये फारशी जागरूकता नाही. याला प्रोत्साहन देण्यासाठी परिवहन विभागाच्या (आरटीओ) नियमांमध्ये बदल करण्याचा विचार सुरू आहे. यात ड्रायव्हिंग लायसन्सवर (वाहन परवाना) रक्ताचा गट लिहिणे सोबतच लायसन्ससाठी अर्ज करताना प्रत्येक व्यक्तीला हे सांगणे अनिवार्य राहणार की संबंधित व्यक्ती अवयव दान करण्यास इच्छुक आहे अथवा नाही?, तशी नोंद लायसन्सवर केली जाईल. यामुळे संबंधित व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास डॉक्टरांना त्याचे तत्काळ अवयव काढणे सोपे जाईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली. इंडियन मेडिकल असोसिएशन, नागपूर शाखा आणि वोक्हार्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अवयव प्राप्ती व प्रत्यारोपण’ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंचावर मुख्य अतिथी म्हणून आ. डॉ. मिलिंद माने, आयएमए नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. अजय काटे, सचिव डॉ. सरिता उगेमुगे, किडनी प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. संजय कोलते, वोक्हार्ट रुग्णालयाच्या प्रमुख के. सुजाता उपस्थित होत्या. गडकरी म्हणाले, ‘आयएमए’ने एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. सध्याच्या काळात वैद्यकीय ज्ञानाने बरीच प्रगती केली आहे. असे असतानाही अवयव दानाच्याप्रति लोकांमध्ये जागरुकता फार कमी आहे. हैदराबादमध्ये अवयव दानाला घेऊन बरीच जागरूकता आहे. नागपूरही अवयव दानाच्या क्षेत्रात समोर येऊ शकते. यासाठी आयएमए आणि डॉक्टरांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी देशात पाच लाखांवर अपघात झाले यात दीड लाख लोकांचा मृत्यू झाला. यातील अनेकांकडून अवयव दान होऊ शकले असते. संचालन डॉ. अल्का मुखर्जी यांनी केले तर आभार डॉ. सरिता उगेमुगे यांनी मानले. कार्यक्रमाला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार, डॉ. अशोक आढाव, डॉ. मिलिंद नाईक, डॉ. बी.के. शर्मा आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘ब्लॅक स्पॉट’ सुधारण्यासाठी ११ हजार कोटीगडकरी म्हणाले, देशात ७२६ संभावित अपघात स्थळ ‘ब्लॅॅक स्पॉट’ शोधून काढण्यात आले आहेत. ते सुधारण्यासाठी ११ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी संकेतस्थळही तयार करण्यात आले आहे. यात ‘ब्लॅक स्पॉट’ची नोंद केल्यावर तो दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राज्यात अपघात निवारण समितीचीही स्थापना करण्यात आल्याचेही ते म्हणाले. गरिबांच्या अवयव प्रत्यारोपणाला विम्याचे कवचअवयव प्रत्यारोपणाचे उपचार आजही गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर आहेत. ही समस्या सोडविण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी सरसकट अवयव प्रत्यारोपण विमा संरक्षण योजना लवकरच अमलात आणण्याचा प्रयत्न आहे. यामुळे पैशांअभावी न होणाऱ्या अवयव प्रत्यारोपणामुळे दुर्बल घटकातील नागरिकांचा मृत्यू ओढवणार नाही. लवकरच ही योजना देशभर लागू होईल, असेही गडकरी म्हणाले.अवयव प्रत्यारोपण कायद्यात बदल आवश्यकगडकरी म्हणाले, देशात अवयव प्रत्यारोपणासाठी लोक तयार आहेत. परंतु कठोर कायद्यामुळे अनेकवेळी त्याचे पालन करणे कठीण जाते आणि प्रत्यारोपण होत नाही. यामुळे अवयव प्रत्यारोपणाच्या कायद्यात बदल करणे ही मागणी आहे. अवयव दान महान कार्यडॉ. संजय कोलते म्हणाले, मृत्यूनंतर चिमूटभर राख होऊन संपून जाण्यापेक्षा, एका जीवनज्योतीने दुसरी ज्योत तेवत राहण्यास मदत करणे, हे महान कार्य आहे. यात प्रत्येकाने समोर यायला हवे. सरकारनेही याच्या जनजागृतीसाठी मदत करणे आवश्यक आहे. एका मेंदूमृत व्यक्तीकडून मिळू शकते १० लोकांना जीवनदानडॉ. अजय काटे म्हणाले, एका मेंदूमृत (ब्रेन डेड) व्यक्तीचे अवयव दान केल्यास आठ ते दहा व्यक्तींला जीवनदान मिळू शकते. सामाजिक बांधिलकी पाळत अवयव दान जनजागृतीसाठी ‘आयएमए’ने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून अवयव दानाची माहिती होण्यासाठी ९६०४४४२२७७ हा हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अवयव दानासाठी आरटीओ नियमांत बदल करणार
By admin | Published: March 13, 2016 3:18 AM