योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: नागपूरला पुराचा मोठा फटका बसल्यानंतर देखील सामाजिक भान न बाळगत चक्क गणेशोत्सवाच्या निमित्ताने लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला संबंधित कार्यक्रमात परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. आश्चर्याची बाब म्हणजे माजी आमदारांच्या मार्गदर्शनातच संबंधित गणेशोत्सवाचे आयोजन होते.
हिल टॉप येथील एकता गणेशोत्सव उत्सव मंडळाच्यावतीने नृत्यांगना गौतमी पाटील हिचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात काही हुल्लडबाजांनी गोंधळ घातला. प्रचंड गर्दी झाल्याने रेटारेटी सुरू झाली व बॅरिकेड्स काढण्याचा प्रयत्न झाला. काही युवकांनी खुर्च्यांची तोडफोड केली आणि खुर्च्यांचे तुकडे हवेत भिरकावले, त्यामुळे गोंधळ उडाला. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
या प्रकरणी गणेशोत्सव मंडळाकडून पोलिसांकडे कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यात आली नाही. नागपुरात पुराचा फटका बसला असताना माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली संचालित होणाऱ्या गणेशोत्सव मंडळाने लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्याची काय गरज होती, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
या प्रकरणी गणेशोत्सव मंडळ किंवा मारामारी करणाऱ्या युवकांकडून कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही, अशी प्रतिक्रिया अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांनी दिली.