नागपूर : नागपुरात आज काँग्रेसच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस प्रदेधाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नितीन राऊत यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडत होती. दरम्यान, दोन स्थानिक नेत्यांमध्ये हमरी तुमरी होऊन वाद उफाळून चांगलाच गोंधळ उडाला.
नागपुरात आज काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक सुरू होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्ष संघटन बांधणीसाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला काँग्रेसच्या नेत्यांसह, पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, भाषण करण्यावरून स्थानिक नेत्यांमध्ये वाद झाला. आमदार विकास ठाकरे व नरेंद्र जिचकार या नेत्यांमध्ये भाषण करू न दिल्याच्या कारणावरून वरिष्ठांसमोरच जुंपली.
माहितीनुसार, काँग्रेस शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे हे प्रास्ताविक करत असताना प्रदेश प्रतिनिधी नरेंद्र जिचकार यांनी मध्येच बोलण्याचा आग्रह करत माईक धरण्याचा प्रयत्न केला, यावरुन त्यांच्यात बाचाबाची झाली. तर, ठाकरे समर्थक आक्रमक झाले आणि जिचकार-ठाकरे कार्यकर्त्यांमध्ये धक्कामुक्की झाली. या गोंधळानंतर बैठक काही काळ तबकूब करण्यात आल्याचे कळते. याबाबत विचारणा केली असता असा काही प्रकार झाला नसल्याचे काही कार्यकर्त्यांनी सांगितले. या गोंधळानंतर वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू असल्याची माहिती आहे.