लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात फैजान खान नामक गुंडाने आपल्या १५ ते २० साथीदारांसह सोमवारी मध्यरात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागात प्रचंड हैदोस घातला. बजेरिया, कॉटन मार्केट, रेल्वेस्थानक मार्ग, संत्रा मार्केट, कॉटन मार्केट, सेवासदन परिसरात रस्त्यावर असलेल्या २० ते २५ वाहनांची तोडफोड केली आणि विरोध करणाऱ्या वाहनचालकांना मारहाण केली. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. हैदोस घालणाऱ्या गुंडांना तातडीने अटक करावी, अशी मागणी करून नागरिकांनी पोलिसांकडे आपला रोष व्यक्त केला. या घटनेमुळे बजेरिया परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते.कुख्यात फैजानविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, तो काही दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला. त्याने खंडणी वसुलीसाठी पुन्हा आपली दहशत पसरविणे सुरू केले आहे. सोमवारी मध्यरात्री कुख्यात फैजान आणि त्याचे १५ ते २० साथीदार सिनेमातील गुंडांप्रमाणे दुचाकींवर बसून निघाले. त्यांच्याकडे लाठ्या, हॉकी स्टीक, बेस बॉलचे दंडे आणि शस्त्रे होती. रस्त्याच्या बाजूला असलेल्या वाहनांची ते विनाकारण तोडफोड करू लागले. बजेरिया, कॉटन मार्केट, रेल्वेस्थानक मार्ग, संत्रा मार्केट, कॉटन मार्केट, सेवासदन परिसरात रस्त्यावर असलेले आॅटो, मालवाहू वाहने, कार अशा २० ते २५ वाहनांची त्यांनी तोडफोड केली. वेडेवाकडे किंचाळत ते तोडफोड करीत होते. विरोध करणाºया वाहनचालकांना कुख्यात फैजान आणि साथीदार मारत होते. पहाटेपर्यंत त्यांचा हैदोस सुरू होता. त्यामुळे वाहनचालकांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती. काम आटोपून किंवा बाहेरगावाहून परतणाºया वाहनचालकांनी स्वत:सह आपल्या प्रवाशांचा जीव कसाबसा गुंडांच्या तावडीतून वाचवला. ज्या भागात कुख्यात फैजान आणि साथीदारांनी हैदोस घातला, त्या भागातील नागरिक हळूहळू एकत्र झाले. मोठ्या संख्येत एकत्र झाल्यानंतर त्यांनी गणेशपेठ ठाण्यावर धाव घेतली. प्रचंड तणाव आणि नागरिकांचा रोष बघता गणेशपेठ पोलीस तसेच आजूबाजूच्या भागातील गस्ती पथकाने तिकडे धाव घेतली. पहाटे ५ च्या दरम्यान पोलीस सक्रिय झाल्यानंतर फैजान आणि त्याचे साथीदार पळून गेले.दरम्यान, दिवसभर वाहने चालवून उदरनिर्वाह करणाºया वाहनचालकांनी सकाळपासून एकत्र होऊन पोलीस ठाण्यावर धडक दिली. कुख्यात फैजान आणि साथीदारांना तातडीने अटक करा, अशी जोरदार मागणी संतप्त नागरिकांनी लावून धरली. प्रारंभी तोडफोडीची तक्रार घेऊन आलेल्या वाहनचालकांना गणेशपेठ पोलीस आपसी वैमनस्यातून तोडफोड झाली असावी, असे सांगून टाळण्याचे प्रयत्न करू लागले. मात्र, व्यक्तिगत वैमनस्यातून एकाच वेळी एवढ्या मोठ्या वाहनांची तोडफोड कशी केली जाऊ शकते, असा प्रश्न वाहनचालकांनी पोलिसांना केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली.वरिष्ठांच्या कानउघाडणीनंतर धावपळदुपार झाली तरी गणेशपेठ पोलीस ठाण्यातील अधिकारी ही बाब गांभीर्याने घ्यायला तयार नसल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. ही माहिती कळताच परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सायंकाळी गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे हेही तिकडे पोहचले. त्यांनी गणेशपेठ ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. आरोपींचा छडा लावण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. त्यातून आरोपींची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर कुख्यात फैजान आणि त्याच्या गुंड साथीदारांना जेरबंद करण्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ तीनमधील पोलीस पथके, गुन्हे शाखेची पोलीस पथके धावपळ करू लागली. रात्री ८ च्या सुमारास कुख्यात फैजान आणि त्याच्या एका साथीदाराच्या मुसक्या पोलिसांनी बांधल्या. वृत्त लिहिस्तोवर पोलीस त्यांची ‘चौकशी’ करीत होते.लकडगंजमध्येही जाळपोळलकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगन्नाथ स्वामी मंदिर जवळ राहणारे पुंडलिक वासुदेवराव हेडाऊ (वय ५३) यांची यामाहा (एमएच ४९/ टी ९५०२) आणि ड्रीम युगा (एमएच ४९/ व्ही ०९१९) अज्ञात आरोपीने जाळून टाकली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. हेडाऊ यांनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.