गडकरी, फडणवीसांवरच भार : स्थानिक नेत्यांनी चालावे जमिनीवरकमलेश वानखेडे नागपूरकेंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. एवढेच काय तर महापालिका व जिल्हा परिषदेवरही भाजपची सत्ता आहे. चौफेर सत्ता असतानाही महापालिकेच्या आगामी निवडणुकीत चार सदस्यांचा प्रभाग करण्याची वेळ भाजपवर का आली, ही बाब भाजपला अंतर्मुख करायला लावणारी आहे. पक्षाचे संघटन मजबूत आहे, सहाही आमदार भाजपचे आहेत. असे असतानाही दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीत धोका होऊ शकतो, असा विचार भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या मनात का आला? गडकरी, फडणवीसांना साथ देणारी जनता महापालिकेत साथ देणार नाही, असे स्थानिक नेत्यांना का वाटू लागले, यावरही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीड दोन वर्षात नागपूरसाठी एम्सपासून ते मिहानपर्यंत, मेट्रो रेल्वेपासून ते सिमेंट रस्त्यांपर्यंत सर्व काही करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. गडकरी- फडणवीस यांची जोडी नागपूरसाठी काहीतरी करीत आहेत, असा मॅसेज नागपूरकरांमध्ये गेला. मात्र, दुसरीकडे महापालिकेतील सत्ताधारी नागपूरकरांवर पाहिजे तेवढी छाप निर्माण करू शकले नाहीत. महापालिकेत सत्ता आहे, शहरात सहाही आमदार भाजपचे आहेत. असे असतानाही प्रचलित दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीतही आपण महापालिकेच्या निवडणुका जिंकू शकतो, असा विश्वास स्थानिक नेते आपल्या ज्येष्ठ नेत्यांना देऊ शकले नाही.नगरसेवक ऐटीत कार्यकर्ते कैचीतगडकरी, फडणवीस आहेत. निवडणूक जिंकणे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचे आहे. त्यामुळे आपल्याला चिंता नाही, अशा ऐटीत भाजपचे काही नगरसेवक वावरत आहेत. मध्यंतरी पक्षाच्या बैठकीलाच काही नगरसेवकांनी दांडी मारली होती. बहुतांश नगरसेवक सत्ताधाऱ्यांच्या गोतावळ्यात जास्त व जनतेत कमी दिसू लागले आहेत. नगरसेवकांच्या अशा वागणुकीमुळे भाजपचा झेंडा घेऊन वॉर्डात प्रचार करणारे संघटनेचे कार्यकर्ते नागरिकांच्या कैचीत सापडू लागले आहेत. काही नगरसेवकांच्या तर संघटनेपर्यंत तक्रारीही आल्या आहेत. भाजप जनमताचे सर्वेक्षण करून कामाचे ‘आॅडिट’ करणारा पक्ष आहे. असे आॅडिट झाले तर ४० टक्के नगरसेवकांचे तिकीट कटून त्यांच्यावर घरी बसण्याची वेळ येऊ शकते. ही वास्तविकता आहे.
चौफेर सत्ता मग चारच्या प्रभागाची वेळ का ?
By admin | Published: July 03, 2016 2:43 AM