लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हरिसाल वनपरिक्षेत्राच्या आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार आराेपी अधिकारी शिवकुमारच्या वेतनातून आणि त्याने जमवलेल्या संपत्तीतून दीपालीच्या आईचा चरितार्थ भागवावा, अशी मागणी ‘जस्टीस फाॅर दीपाली चव्हाण’ अभियानाच्या प्रमुख अरुणा सबाने यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
दीपाली यांच्या आई आर्थिकदृष्ट्या दीपाली यांच्यावर अवलंबून हाेत्या. दीपाली यांच्या सुसाईड नाेटवरून ही बाब ठळकपणे लक्षात येते. २०१३च्या कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत पीडिता किंवा तिच्या कुटुंबियांना आराेपीच्या उत्पन्नातून नुकसानभरपाई देण्याची तरतूद असल्याची बाब सबाने यांनी निवेदनात नमूद केली आहे. संबंंधित विभागाच्या मंत्र्यांनी तशाप्रकारचे आदेश काढावे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने त्यावर पावले उचलावी. यामुळे पीडितेच्या कुटुंबाला आर्थिक लाभ मिळेल आणि अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही धडा शिकवता येईल. हा आदेश म्हणजे अशाप्रकारच्या प्रकरणांमध्ये माेठे उदाहरण ठरेल, असे मत सबाने यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, शिष्टमंडळाने वन विभागातर्फे तयार केलेल्या आत्महत्येच्या ९ सदस्यीय चाैकशी समितीवरही आक्षेप घेतला. या समितीतील बहुतांश वन अधिकारी हे श्रीनिवास रेड्डीच्या मर्जीतले आणि स्वयंसेवी संस्था लाभार्थी आहेत. ते दबावाखाली येऊ शकतात. त्यामुळे या घटनेचा तटस्थपणे विचार करणारे, न्याय देणारे निर्भीड सदस्य हवेत. या समितीने रेड्डी व शिवकुमारची चाैकशी साेडून दीपाली यांची चाैकशी चालवली आहे. या समितीतील बहुतांश सदस्य हे आयएफएसच्या मर्जीतील आहेत. पाच - पाच आयएफएस अधिकारी कशासाठी? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या समितीत सेवानिवृत्त न्यायाधीश, सरकारी वकील, सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी आणि प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश असावा, अशी मागणी त्यांनी केली.
श्रीनिवास रेड्डी यांना अटक कधी?
दीपालीचा मानसिक आणि शारीरिक छळ जरी प्रत्यक्ष शिवकुमार यांनी केलेला असला, तरी तक्रार करूनही रेड्डींनी दीपालीची मदत केली नाही. उलट शिवकुमारला वारंवार पाठीशी घातले. त्यामुळे या आत्महत्येला शिवकुमार इतकेच निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी हे सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. मात्र, आत्महत्येला २० दिवस उलटूनही रेड्डी यांना अद्याप अटक झालेली नाही. अचलपूर न्यायालयानेही रेड्डीचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतरही अद्याप रेड्डीला अटक का केली नाही, असा प्रश्नही सबाने यांनी उपस्थित केला. अनेक सबळ पुरावे रेड्डीच्या विरुद्ध असूनही रेड्डीला अमरावतीचे पोलीस अधीक्षक वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत की काय, अशी शंका येते. त्यामुळे ही चौकशी अमरावती पोलिसांकडून काढून घेण्यात यावी, अशीही मागणी केली.