लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्यवर्ती कारागृहातील कैद्यासाठी अमली पदार्थाचीतस्करी करणाऱ्या कारागृहाच्याच एका कर्मचाऱ्याचा डाव कारागृह अधीक्षकांच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. चरसची खेप घेऊन कारागृहात दाखल होताच बुधवारी सायंकाळी तस्करी करणाऱ्या कर्मचाऱ्याला तुरुंग रक्षकांनी जेरबंद केले. त्याच्याकडून २७ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले. त्याला नंतर पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
मंगेश मधुकर सोळंकी (वय २९) असे दोषी तुरुंग कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो मूळचा अकोला जिल्ह्यातील रहिवासी असून दोन वर्षांपूर्वीच कारागृहात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाला होता. गेल्या काही दिवसांपासून सोळंकीचे वर्तन संशयास्पद वाटत असल्याने कारागृह अधीक्षक अनुपकुमर कुमरे यांनी अन्य तुरुंग रक्षकांना त्याच्यावर नजर ठेवायला सांगितली होती. या पार्श्वभूमीवर, सोळंकी बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कारागृहात दाखल झाला. त्याने आमद देताच (एन्ट्री करणे) त्याच्यावर पाळत ठेवून असलेल्या कारागृहातील कर्मचाऱ्यांनी त्याची झडती घेतली. त्याच्या डाव्या पायाच्या सॉक्समध्ये एक पाऊच आढळला. तो उघडून बघितला असता त्यात चरस आढळले. वजन केले असता पाऊचमधील चरसचे वजन २७ ग्रॅम भरले. ही माहिती कळाल्यानंतर कारागृह अधीक्षक कुमरे यांनी त्याला ताब्यात घेण्याचे आदेश दिले.
तीन हजारांची डील
अधीक्षक कुमरे यांनी चरसच्या तस्करीबाबत सोळंकीची नंतर प्रदीर्घ चौकशी केली. कारागृहात गोपी नामक कुख्यात गुंड बंद आहे. हत्येच्या गुन्ह्यात त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. गोपी चरसी आहे. त्याला चरस पिण्यासाठी हवी, ती कारागृहाच्या आत पोहोचवण्यासाठी सोळंकीने गोपीच्या नंबरकारीसोबत (बाहेर असलेल्या साथीदारांसोबत) तीन हजारांत डील केली होती. बुधवारी दुपारी गोपीच्या नंबरकारीने सोळंकीला चरसची खेप दिली. ती घेऊन तो कारागृहाच्या आत पोहोचला अन् पकडला गेला.
मध्यरात्री पोहोचले पोलीस
सोळंकीची अंतर्गत चौकशी केल्यानंतर कारागृहाच्या उच्चाधिकाऱ्यांना हा अहवाल पाठविला गेला. त्यानंतर पोलिसांना रात्री उशिरा तक्रार देण्यात आली. त्यानुसार मध्यरात्री धंतोलीचे पोलीस कारागृहात पोहोचले. आरोपी सोळंकीला त्यांच्या हवाली करण्यात आले. पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार (एनडीपीएस) गुन्हा दाखल करून सोळंकीला अटक केली.