नागपूर विद्यापीठ : अनेक महाविद्यालयांमध्ये सुरू आहे प्रकारयोगेश पांडे नागपूरराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून येत्या महिन्याभरात इतर परीक्षादेखील सुरू होणार आहेत. यंदा विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ‘आॅनलाईन’ ओळखपत्रे उपलब्ध करून दिली असून महाविद्यालयांकडून ती घेण्याची सोय ठेवण्यात आली आहे. परंतु काही महाविद्यालयांकडून याचा गैरफायदा घेण्यात येत असून परीक्षा प्रवेशपत्र देण्याच्या बदल्यात प्रति विद्यार्थी ३० ते ५० रुपयांची शुल्कवसुली करण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे.नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांसाठी परीक्षा विभागाने ‘एमकेसीएल’सोबत जोरदार तयारी सुरू केली . ‘एमकेसीएल’ तर्फे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ‘आॅनलाईन’ प्रवेशपत्र ‘अपलोड’देखील करण्यात आले. महाविद्यालयांच्या ‘लॉगिन’मधून विद्यार्थ्यांना ते उपलब्ध होणार होते. परंतु अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्रच ‘डाऊनलोड’ होत नसल्याने महाविद्यालयांचे कर्मचारी हैराण झाले होते. अनेक महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांना तर ओळखपत्रे कशी ‘डाऊनलोड’ करायची याचीदेखील माहिती नाही. त्यामुळे महाविद्यालयांनी बाहेरील व्यक्तींची मदत घेतली व त्यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यापासून ते प्रवेशपत्र ‘डाऊनलोड’ करून घेण्यापर्यंतची कामे करून घेतली. त्याचाच मोबदला म्हणून विद्यार्थ्यांकडून ३० ते ५० रुपये आकारण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्राचार्य म्हणतात विद्यापीठानेच पाठविले पत्रयासंदर्भात ‘लोकमत’ प्रतिनिधीने काही प्राचार्यांशी संपर्क केला असता आश्चर्यजनक उत्तर ऐकायला मिळाले. कामठी मार्गावरील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी तर असे पैसे घेण्यासाठी विद्यापीठाकडूनच पत्र आले असल्याचा दावा केला. यासंदर्भात त्यांना आणखी विचारणा केली असता, ‘एमकेसीएल’ने असे पत्र पाठविले असल्याचे त्यांनी सांगितले. इतरही प्राचार्यांनी अशीच बुचकळ््यात टाकणारी उत्तरे दिली. विद्यापीठाने ‘ई’सुविधेसाठी जे ४०-५० रुपये घेतले आहेत, ते परीक्षा विभागासाठी आहेत आणि ‘एमकेसीएल’ जे काम करत आहे, त्यासाठी विद्यार्थ्यांकडून ३० ते ५० रुपये घेण्यात येत असल्याचा तर्क एका प्राचार्याने मांडला.
प्रवेशपत्राच्या नावाखाली शुल्कवसुली
By admin | Published: October 28, 2015 3:00 AM