लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - उपराजधानीत खळबळ निर्माण करणाऱ्या महिला जळीत कांडात सदर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा प्रियकर शादाब आफताब आलम (वय ३२) याला हत्या करून पुरावा नष्ट केल्याच्या आरोपाखाली अटक केली.
शबाना अब्दुुल जावेद (वय ४०) असे मृत महिलेचे नाव असून ती पाचपावलीच्या महेंद्रनगरात राहत होती. तिला पती आणि दोन मुले आहेत. शबाना धंतोलीतील एका ऑटोमोबाईलच्या शोरूममध्ये काम करायची. शुक्रवारी रात्री ७.३० च्या सुमारास काम आटोपून ती घराकडे निघाली. रात्री ९ च्या सुमारास शादाबने तिला गंभीर जळालेल्या अवस्थेत खासगी इस्पितळात दाखल केले. शबानाच्या नातेवाईकांना ही माहिती कळाल्यानंतर ते तेथे पोहचले. तत्पूर्वीच शादाब तेथून निघून गेला. डॉक्टरांनी पोलिसांना जळीतकांडाची माहिती दिली. त्यानंतर शनिवारी पहाटेच्या वेळी पोलीस तेथे पोहचले. त्यांना बयाण देताना शबाना म्हणाली की, आपण शुक्रवारी रात्री ७.३० च्या सुमारास हल्दीराम समोरून जात असताना वळणावर तरुण-तरुणी आपल्याला भांडताना दिसले. त्यांचा वाद सोडवण्यासाठी गेले असता आरोपी तरुणाने पेट्रोल ओतून आपल्याला जाळले. हे बयान दिल्यानंतर शनिवारी सकाळी शबानाची प्रकृती बिघडली आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. वर्दळीच्या ठिकाणी एका महिलेला जीवंत पेटवून दिल्याचे वृत्त उपराजधानीत खळबळ निर्माण करणारे ठरले. पोलिसांनी नमूद ठिकाणचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले मात्र त्यात पोलिसांना काहीही आढळले नाही. परंतू शबानाला रुग्णालयात दाखल करणारा शादाब पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर भलताच घटनाक्रम पुढे आला.
---
ब्रेकअप पॅचअप
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या संबंधाने रविवारी पत्रकारांना माहिती दिली. त्यानुसार, शबाना आणि शादाब (वय ३२)ची फेसबुकवर २०१७ मध्ये ओळख झाली. तो गुगल बेस (संचालित) कंपनीत काम करतो. बैरामजी टाऊनमधील आकार बिल्डींगमध्ये राहतो. शबानाची दुसऱ्याच नावाने फेसबुक आयडी होती. ती विवाहित आहे, तिला दोन मुले आहेत, हे तिने शादाबला सांगितले नाही. फुटाळ्यावर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. ते लग्नही करणार होते. मात्र, चार महिन्यांपूर्वी शादाबला शबाना विवाहित असल्याचे माहीत पडल्यामुळे त्यांच्यात खटके उडू लागले. अलिकडे शबानाने त्याच्यामागे लग्नासाठी तगादा लावला होता. शुक्रवारी ती शादाबच्या फ्लॅटवर पोहचली. तेथे लग्नाचा विषय काढल्यानंतर या दोघांमध्ये पुन्हा कडाक्याचा वाद झाला आणि आरोपी सांगतो त्याप्रमाणे शबानाने स्वताच्या पर्समधील पेट्रोल स्वतावर ओतले आणि माचिसची काडी उगाळून पेटवून घेतले.
---
रुग्णालयात नेले आणि पुरावे मिटवले
शादाबने शबानाला रुग्णालयात दाखल केले. तेथून फ्लॅटवर पोहचल्यानंतर त्याने या जळीत प्रकरणाचे पुरावे मिटवले. पोलिसांना तातडीने घटनाक्रम कळवायला हवा होता. मात्र, तसे त्याने केले नाही. शबानाने मृत्यूपूर्वी शादाबने पेटविल्याचा उल्लेख केला नाही. त्यामुळे शबानाने स्वताला जाळून घेतल्यावर विश्वास करता येत नाही. त्याचमुळे सदरचे ठाणेदार संतोष बाकल यांनी शादाबविरुद्ध हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला. शादाबला अटक करून त्याची १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे.
---