नागपूर : गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी नागपुरातील बहुचर्चित मनीष श्रीवास खूनप्रकरणामध्ये कामठी येथील कुख्यात रणजित हलके सफेलकर याच्यासह एकूण १२ आरोपींविरुद्ध मोक्का कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात सुमारे पाच हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले.
इतर आरोपींमध्ये शरद ऊर्फ कालू नारायण हाटे (४१, रा. जुनी कामठी), भरत नारायण हाटे (४३, रा. जुनी कामठी), हेमलाल ऊर्फ हेमंत लालबहादूर गोरखा (४८, रा. नवीन कामठी), विशाल ऊर्फ इशाक नंदू मस्ते (३५, रा. सदर), विनयकुमार ऊर्फ गोलू द्वारकाप्रसाद बाथव (४२, रा. तहसील), श्रीनिवास ऊर्फ सिनूअन्ना अंजेया वियनवार (४७, रा. कन्हान), रवी ऊर्फ छोटू टिकाराम बागडे (३९, रा. कपिलनगर), दिवाकर बबन कोत्तुलवार (३६, रा. बेसा), शैलेश ऊर्फ काल्या तिलकचंद मेश्राम (२५, रा. कामठी), अब्दुल ताज अब्दुल अजीज (३०, रा. नवीन कामठी) व शेख मोहतासिंग शेख सरदार (३५, रा. नवीन कामठी) यांचा समावेश आहे. ही घटना २०१२ मध्ये घडली होती. मनीष श्रीवास हादेखील कुख्यात गुंड होता. आरोपींनी ४ मार्च २०१२ रोजी श्रीवासचे अपहरण करून त्याचा पवनगाव येथील शेतात खून केला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते मध्य प्रदेशातील कुरई येेथील जंगलात फेकले. गुन्हे शाखा पोलिसांना तब्बल नऊ वर्षांनंतर या प्रकरणाचा उलगडा करण्यात यश मिळाले.