लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : पाॅवर प्लांटच्या गाेडाऊनमध्ये ठेवलेले गाईड राेलर व राेलर अज्ञात चाेरट्याने चाेरून नेले. त्या साहित्याची किंमत २६ लाख ४० हजार रुपये आहे. ही घटना बुधवारी (दि. ८) उघडकीस आली.
प्रशांत कुमार बेहरा (३७, रा. भुनेश्वर, ओडिशा, हल्ली मु. लेबर ग्रीन माॅडर्न स्कूल, पांजरा काेराडी) हे पाॅवर प्लांट कंपनीमध्ये स्टाेअर इन्चार्ज म्हणून कार्यरत असून, त्यांच्या कार्यक्षेत्रात काेराडी प्लांटचा समावेश आहे. बेहरा यांनी कंपनीच्या कामाकरिता कन्व्हेअर प्लांटमध्ये लावण्यासाठी गाईड राेलर १०८ बाय ३०० के १३० नग आणि राेलर २५० बाय १३२ के २४ नग ऑर्डर केले हाेते. हे संपूर्ण साहित्य कंपनीच्या गाेडाऊनमध्ये ठेवले हाेते. शिवाय बेहरा हे नेहमी सर्व साहित्याची वेळाेवेळी तपासणी करीत हाेते. २५ ऑगस्टला त्यांनी गाेडाऊनमधील सर्व साहित्याची तपासणी केली हाेती. दरम्यान, गाेडाऊनचे टिनपत्रे ताेडून चाेरट्याने तेथील गाईड राेलरचे प्रत्येकी २० हजार रुपये किमतीचे १२० नग आणि प्रत्येकी ३० हजार रुपये किमतीचे राेलरचे आठ नग असा एकूण २६ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही बाब लक्षात आल्यानंतर प्रशांत बेहरा यांनी खापरखेडा ठाण्यात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी भादंवि कलम ४६१, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक निमगडे करीत आहेत.