लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सर्व राज्यांतील धर्मादाय संस्थांनी (ट्रस्ट) गरजूंना मदत करण्याचे आवाहन राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी केले आहे.सध्या राज्यामध्ये कोरोना (कोविड-१९) या विषाणूच्या फैलावामुळे जगातील इतर देशांप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा सामना करण्यासाठी केंद्र शासन तसेच राज्य शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता गरीब व कष्टकरी तसेच मजूर यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि औषधोपचार पुरविण्याची तसेच पंतप्रधान सहायता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आर्थिक स्वरूपात मदत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शासन सर्व उपाययोजना करीत आहेत. याकरिता धर्मादाय संस्था अथवा ट्रस्टने पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पीडितांना आणि गरजूंना मदत होणार आहे. शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन बंधनाच्या अधीन राहून, आरोग्यविषयक मार्गदर्शन तत्त्वांचे पालन करून तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, तहसीलदार या शासकीय यंत्रणांशी समन्वयाने व परवानगीने गरजूंना व पीडितांना सर्व धर्मादाय संस्थांनी मदत करावी, असे आवाहन धर्मादाय आयुक्तांनी धर्मादाय संस्थांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.गरजूंना मदत करताना शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचा कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही आणि संबंधितांकडून कोरोना प्रसार प्रतिबंधक आरोग्यविषयक सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याची खबरदारी आणि दक्षता घ्यावी, असे आयुक्तांनी पत्रात नमूद केले आहे. या संदर्भातील पत्राची माहिती राज्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे.