नागपूर : संजीवनी नवजीवन विकास शिक्षण प्रसारक संस्थेला स्वत:च्या ताब्यात ठेवण्यासाठी बनवाबनवी करून तत्कालीन अध्यक्षाने मंजूर करून घेतलेला बदल अहवाल सहायक धर्मादाय आयुक्तांनी फेटाळून लावला. बबनराव पुसदेकर, असे या तत्कालीन अध्यक्षाचे नाव आहे. ही शिक्षण संस्था १९७८ मध्ये स्थापन झाली. दर पाच वर्षांनी संस्थेची निवडणूक होते. २०१२ पर्यंत पुसदेकर यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणी होती. त्यांच्या अध्यक्षपदाला इतर पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य कंटाळलेले होते. त्यांना अध्यक्षपदावरून पदच्युत करण्याच्या हालचाली सुरू असतानाच उलट त्यांनीच संस्थेची आमसभा व निवडणूक झाल्याचे कागदोपत्री दाखविले, सदस्य व इतर पदाधिकाऱ्यांच्या बनावट सह्या केल्या. स्वत:ला अध्यक्षस्थानी कायम ठेवले. सचिव मधुकर निकम यांच्या ऐवजी देवेंद्र मुडे यांना केले. इतर पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांमध्ये स्वत:च्या मर्जीने बदल केला. हा बदल अहवाल मूळ पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून मंजुरीसाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला. हा अहवाल २९ आॅक्टोबर २०१२ रोजी सहायक धर्मादाय आयुक्ताने मंजूर केला होता. यासाठी कुठलीही सुनावणी न घेता अहवाल एकतर्फी मंजूर करण्यात आला होता. या अहवालाबाबत कळताच मंजुरीच्याच दिवशी पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला होता. २ नोव्हेंबर २०११ रोजी पुसदेकर यांच्या बदल अर्जातील नऊ जणांपैकी सात सदस्यांनी अपील केले होते. बनवाबनवी केल्यावरून पुसदेकर आणि मुडेविरुद्ध नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. दरम्यान धर्मादाय आयुक्ताच्या न्यायालयात ३ एप्रिल २०१४ रोजी अपिलावर सुनावणी होऊन २९ आॅक्टोबर २०१२ चा तत्कालीन सहायक धर्मादाय आयुक्तांचा आदेश खारीज करून बदल अर्ज पुनर्चौकशीसाठी सहायक धर्मादाय आयुक्ताच्या न्यायालयात पाठविण्यात आला होता. या बदल अर्जावर सहायक धर्मादाय आयुक्त मंगला कांबळे यांच्या न्यायालयात पुनर्सुनावणी व चौकशी प्रारंभ झाली. १४ आॅगस्ट २०१४ रोजी अंतिम सुनावणी निश्चित झाली असताना पुसदेकर यांनी आक्षेपकर्त्यांच्या सह्या हस्ताक्षर तज्ज्ञाकडून तपासण्यासाठी अर्ज केला. तो फेटाळण्यात आला. याविरुद्ध पुसदेकर यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. १६ फेब्रुवारी २०१६ रोजी ही याचिका खारीज केली. त्यामुळे पुन्हा जुना बदल अर्ज अंतिम सुनावणीसाठी लागला. तो १ एप्रिल २०१६ रोजी सहायक धर्मादाय आयुक्ताने खारीज केला. सध्या संस्थेचे अध्यक्ष भाऊराव खारकर, सचिव मधुकर निकम, उपाध्यक्ष दिवाकर कुरटकर, सहसचिव हनुमंत ताडपेल्लीवार आणि कोषाध्यक्ष जनार्दन चिकनकर हे आहेत. न्यायालयात संस्थेच्या वतीने अॅड. अमोल भिसे तर पुसदेकर यांच्या वतीने अॅड. महेश दांडेकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
धर्मादाय आयुक्तांनी तत्कालीन अध्यक्षाचा अहवाल फेटाळला
By admin | Published: May 15, 2016 2:43 AM