लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : पाेलिसांनी खैरी (ता. कामठी) शिवारात केलेल्या कारवाईमध्ये रेतीची विनाराॅयल्टी वाहतूक करणारे छाेटे मालवाहू वाहन पकडले. त्यात वाहनचालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून वाहन व रेती असा एकूण तीन लाख तीन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि. ७) दुपारी ३ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
शिवकुमार केशवराम निशाद (२१, रा. विजयनगर, कळमना, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी वाहनचालकाचे नाव आहे. कामठी (नवीन) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना कामठी परिसरातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांनी कामठी-नागपूर मार्गावरील खैरी शिवारात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. यात त्यांनी कामठीहून नागपूरच्या दिशेने जात असलेले एमएच-४०/सीडी-०५५४ क्रमांकाचे छाेटे मालवाहू वाहन थांबवून झडती घेतली.
त्या वाहनात रेती असल्याचे निदर्शनास येताच पाेलिसांनी कागदपत्रांची तपासणी केली. चाैकशीदरम्यान ती रेतीची विनाराॅयल्टी वाहतूक असल्याचे पाेलिसांनी वाहनचालक शिवकुमार यास अटक केली आणि त्याच्याकडून रेतीसह वाहन जप्त केले. ती रेती कन्हान नदीच्या बिना (ता. कामठी) घाटातून आणली असल्याचेही त्याने पाेलिसांना सांगितले. या कारवाईत तीन लाख रुपयांचे वाहन आणि तीन हजार रुपयांची रेती असा एकूण तीन लाख तीन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार संजय मेंढे यांनी दिली. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई दुय्यम पाेलीस निरीक्षक राधेश्याम पाल, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, हेडकॉन्स्टेबल मनोहर राऊत, प्रमोद वाघ, नीलेश यादव, ललित शेंडे, रोशन पाटील यांच्या पथकाने केली.