‘अनफॉरगेटेबल मेलोडीज आॅफ मो. रफी अॅण्ड किशोरदा’ : सिद्धिविनायक पब्लिसिटीचे आयोजन नागपूर : एकाच गायकाच्या गाण्याची खरे तर अनेक रूपे असतात. त्यांच्या आठवणी रसिकांना कायम भुरळ घालत असतात. रुपेरी पडद्यावरील वैविध्यपूर्ण गीतांना ध्वनिरूप देणाऱ्या दोन महान गायकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या अमीट गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन श्री सिद्धीविनायक पब्लिसिटीतर्फे करण्यात आले. हा कार्यक्रम सायंटिफिक सभागृहात पार पडला. मो. रफी यांची पुण्यतिथी तर किशोरकुमार यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे शीर्षक ‘अनफॉरगेटेबल मेलोडिज आॅफ मो. रफी अँड किशोरदा’ असे होते. संस्थेच्या डायमंड फॉर एव्हर या मालिकेतील या कार्यक्रमाची संकल्पना समीर पंडित यांची होती. कार्यक्रमात मयंक लखोटिया, सागर मधुमटके, श्रीनिधी घटाटे यांनी या दोन्ही गायकांच्या गीतांचे सुरेल सादरीकरण करून रसिकांची दाद घेतली. मयंकच्या ‘शिर्डीवाले साईबाबा...’ या गीताने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर ‘पुकारता चला हँु मै.., क्या हुआ तेरा वादा..., कौन है जो सपनो मे आया.., तु इस तरह से मेरी जिंदगी मे शामिल है.., तुम तो मिल गये हो..., दर्दे दिल दर्दे जिगर...’ आदी गीते यावेळी सादर करण्यात आली. रफी यांची गीते भावपूर्णतेने सादर करण्यात आल्याने रसिकांचीही दाद मिळाली. त्यानंतर किशोरकुमार यांच्या हरहुन्नरी स्वरातील गीते त्याच ताकदीने सादर करणाऱ्या नागपूरकरांच्या लाडक्या सागर मधुमटके या गायकाने किशोरदांची गीते सादर करून कार्यक्रमाला अधिक उंचावर नेले. सागर आणि श्रीनिधी यांनी सादर केलेल्या अनेक गीतांना वन्समोअर देत रसिकांनी हा कार्यक्रम एन्जॉय केला. यावेळी सागरने ‘फिर वही रात है.., ओ हंसिनी तू कहा चली.., फुलो के रंग से.., खिलते है गुल यहाँ.., ठंडी हवा ये चाँद ये सुहानी.., प्यार दिवाना होता है.., नदिया से दरिया...’ आदी गीते सादर केलीत. तर श्रीनिधीसह ‘आप की आँखो कुछ महके हुए से..., तुम आ गये हो..’ आदी गीते सादर करण्यात आली. रूपाली कोंडावार यांचे सहज निवेदन सुखावणारे होते. गायकांना विविध वाद्यांवर पवन मानवटकर, पंकज यादव, श्रीकांत पिसे, अशोक टोकलवार, रिंकु निखारे, प्रकाश चव्हाण, अक्षय हरले, रवी गजभिये यांनी साथसंगत केली. (प्रतिनिधी)
अमिट गोडीच्या गीतांची मोहिनी
By admin | Published: August 05, 2014 1:03 AM