नागपूर : मिहानमध्ये बोर्इंग विमानाच्या देखभालासोबतच आता छोट्या चार्टर विमानांची देखरेख होणार आहे. इंडमार एव्हिएशन सर्व्हिसेस मुंबई या कंपनीला साडेतीन एकर जागा देणार आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने हा निर्णय शुक्रवारी अप्रुव्हल कमिटीच्या बैठकीत पारित केला. इंडमार प्रायव्हेट जेट विमानांसोबतच हेलिकॉप्टरच्या दुरुस्ती व देखभालीचे काम करते. सध्या कंपनीचे देखभाल व दुरुस्ती केंद्र मुंबई, दिल्ली व अहमदाबाद येथे आहेत. भविष्यात मुंबई, दिल्ली व नागपूरमध्ये वाढणाऱ्या खाजगी चार्टर विमानांच्या फेऱ्यांची संख्या लक्षात घेता कंपनीने आपले देखभाल केंद्र नागपुरात स्थापन करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक वर्षाआधी देखभाल केंद्राकरिता ३० एकर जागा देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र मिहानच्याबाबतीत भ्रम निर्माण झाला होता. यातच एअर इंडिया बोर्इंगने आपले देखभाल व दुरुस्ती केंद्र नागपुरात स्थापन केल्यावर इंडमार कंपनीने हा निर्णय घेतला आहे. इंडमारने जागेच्या मागणीसोबतच पूर्वी दिलेल्या प्रस्तावाचे दस्तऐवज दाखल केले. याच बैठकीत मार्कसन फार्मा या कंपनीला जमीन देण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. मात्र मार्कसन फार्माने काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याने सध्या त्यांना जमीन देण्याच्या प्रस्तावावर निर्णय होऊ शकला नाही. राज्यात आलेल्या नव्या सरकारने एमएडीसीच्या स्थानिक बैठकींवर भर दिला आहे. याचमुळे प्रत्येक तीन महिन्यात नियमित एक बैठक घेतल्या जात आहे. (प्रतिनिधी)
मिहानमध्ये होणार चार्टर विमानांची देखभाल
By admin | Published: May 10, 2015 2:22 AM