नागपूर : संशयावरून पोलिसांनी तीन तरुणांचा पाठलाग केला असता एका आरोपीच्या बॅगमध्ये चक्क पिस्तुल व ९ काडतुसे आढळून आले. मध्यप्रदेशातून हे तरुण पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना लुटण्यासाठी आले होते. गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने ही कारवाई केली.
शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल सेंट्रलच्या मागील भागात गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर होते. त्यावेळी तीन तरुण संशयास्पद फिरताना दिसून आले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी धूम ठोकली. पोलिसांनी पाठलाग करत एकाला पकडले. त्याच्या बॅगची झडती घेतली असता त्यात पिस्तुल, ९ जिवंत काडतुसे, दोन मोबाईल फोन सापडले. आरोपीचे नाव आशीष जगदीश शर्मा (३४, अंजनीनगर, भिंड, मध्यप्रदेश) असे आहे. अमित राजवीर शर्मा (३०) व राहुल हे उत्तरप्रदेशातील त्याचे सहकारी फरार झाले. शहरातील लहानमोठ्या व्यापाऱ्यांना लुटण्यासाठी हे तिघे नागपुरात आले होते. त्यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे, बजबळकर, काठोके, सतिश पांडे, दशरथ मिश्रा, विजय श्रीवास, संतोषसिंह ठाकूर, जितेश रेड्डी, दीपक दासरवार, विशाल रोकडे, प्रमोद देशभ्रतार, विजय लाखडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.