तिचा पाठलाग करणे, ढकलणे विनयभंग नाही - हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 09:29 AM2024-01-05T09:29:01+5:302024-01-05T09:30:04+5:30
एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने वर्धा येथे एफआयआर दाखल केला होता की, ती सायकलवरून बाजारात जात असताना मोहम्मद एजाज शेख इस्माईलने तिचा पाठलाग केला. नंतर त्याने तिला शिवीगाळ केली व ढकलले. इस्माईलने यापूर्वीही तिचा पाठलाग केला होता.
डॉ. खुशालचंद बाहेती -
नागपूर : महिलेचा पाठलाग करणे, तिला शिवीगाळ करणे आणि सायकल चालवताना ढकलणे, हा विनयभंगाचा गुन्हा ठरत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने म्हटले आहे.
एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने वर्धा येथे एफआयआर दाखल केला होता की, ती सायकलवरून बाजारात जात असताना मोहम्मद एजाज शेख इस्माईलने तिचा पाठलाग केला. नंतर त्याने तिला शिवीगाळ केली व ढकलले. इस्माईलने यापूर्वीही तिचा पाठलाग केला होता.
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात वर्धा न्यायालयाने इस्माइलला ३५४ आयपीसीअंतर्गत विनयभंग केला म्हणून दोषी ठरवत शिक्षा दिली. सत्र न्यायाधीशांनी शिक्षेविरुद्धचे अपील फेटाळले म्हणून इस्माईलने उच्च न्यायालयात धाव घेतली.
आरोपीने तिला अयोग्यरीत्या स्पर्श केला किंवा शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागाला धक्का दिला, ज्यामुळे तिला लज्जा वाटली, हे मुलीने सांगितले नसल्याचे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले.
‘सायकलवर असताना आरोपीने धक्का दिला, याला तक्रारदाराच्या शालीनतेला धक्का पोहोचवणारे कृत्य म्हणता येणार नाही. हे कृत्य आक्षेपार्ह किंवा त्रासदायक असू शकते; परंतु त्यामुळे महिलेचा विनयभंग झाला असे म्हणता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी मोहम्मद इस्माइलची ३५४ आयपीसीच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात हायकोर्टाने राजू पांडुरंग महाले विरुद्ध महाराष्ट्र राज्य या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ दिला. सुप्रीम कोर्टाच्या या निकालानुसार, कलम ३५४ आयपीसीचा गुन्हा होण्यासाठी एखाद्या महिलेवर आरोपीने विनयभंगाच्या हेतूने बळाचा वापर करणे आवश्यक असते.
हायकोर्टाचे निरीक्षण
एखाद्या महिलेचा काही वेळा पाठलाग करणे, तिला शिवीगाळ करणे आणि तिला सायकल चालवताना ढकलणे हे त्रासदायक असू शकते; परंतु यामुळे स्त्रीच्या शालीनतेच्या भावनेला धक्का बसणार नाही, म्हणून हे कृत्य विनयभंग ठरत नाही.
- न्यायमूर्ती अनिल एल. पानसरे,
मुंबई हायकोर्ट, नागपूर खंडपीठ