नागपूर : एका रोडरोमियोने त्याच्या परिचयातील विवाहित महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. तसेच लग्न न केल्यास पतीला ठार मारण्याची धमकी दिली. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
महेश राजू वानखेडे (२३, धंतोली) असे आरोपीचे नाव आहे. संबंधित २२ वर्षीय महिला धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतच राहते. महेश त्या महिलेला ओळखायचा. त्याने तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला व २०२२ सालापासून तिला त्रास द्यायला लागला. तो तिला विनाकारण फोन तसेच एसएमएस करून त्रास द्यायचा. त्याने अनेकदा तिचा पाठलाग करून बोलण्यासाठी जबरदस्ती केली.
१५ जून रोजी त्याने तिला एका ठिकाणी थांबविले व माझ्याशी लग्न कर असे म्हणायला लागला. जर लग्न केले नाही तर तुझ्या पतीला ठार मारेन अशी धमकी देत भर रस्त्यावर त्याने तिला शिवीगाळ केली. तसेच तिचा विनयभंग केला. तेव्हापासून महिला दहशतीत होती. अखेर तिने हिंमत करून घरच्यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर तिने धंतोली पोलीस ठाण्यात महेशविरोधात तक्रार केली. पोलिसांनी महेशविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे