चतुर्वेदी समर्थक येणार का देवडियात ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:40 PM2018-02-24T23:40:29+5:302018-02-24T23:40:59+5:30
चतुर्वेदींवरील कारवाईनंतर आज रविवारी शहर काँग्रेसने देवडिया काँग्रेस भवनात बैठक बोलाविली आहे. या बैठकीत चतुर्वेदींचे कोण कोण समर्थक येतात, गटबाजी सोडून काँग्रेसला एकसंघ करण्याचा निर्धार करतात, याकडे काँग्रेसजनांसह प्रदेश काँग्रेसचेही लक्ष लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गटबाजीला लगाम घालून पक्षशिस्त पाळण्याचा संदेश देण्यासाठी प्रदेश काँग्रेसतर्फे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यावर कारवाई करीत त्यांना पक्षातून निष्कासित करण्यात आले. चतुर्वेदींवरील कारवाईनंतर आज रविवारी शहर काँग्रेसने देवडिया काँग्रेस भवनात बैठक बोलाविली आहे. या बैठकीत चतुर्वेदींचे कोण कोण समर्थक येतात, गटबाजी सोडून काँग्रेसला एकसंघ करण्याचा निर्धार करतात, याकडे काँग्रेसजनांसह प्रदेश काँग्रेसचेही लक्ष लागले आहे.
शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सकाळी ११ वाजता देवडिया भवनात शहर कार्यकारिणी, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांवर कारवाई केल्यामुळे महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला जाणार आहे. शहरातील काँग्रेसजनांना एकत्र करून पक्ष बळकट करण्यावर चर्चा केली जाणार आहे. सोबतच पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना, पक्षाच्या बैठकीला पाठ दाखविणाऱ्यांना इशाराही दिला जाणार आहे.
या बैठकीला शहर काँग्रेसच्या नियमित मासिक बैठकीचे स्वरूप देण्यात आले असले तरी पडद्यामागील वास्तविकता वेगळीच आहे. चतुर्वेदींवरील कारवाईनंतर त्यांचे समर्थक नेते, कार्यकर्ते, नगरसेवक पक्षाच्या बैठकीला येतात का, की अनुपस्थित राहून अप्रत्यक्षपणे चतुर्वेदी यांना पाठिंबा दर्शवितात याची पडताळणी केली जाणार आहे. चतुर्वेदींवरील कारवाईनंतरही पक्षाच्या पदावर असलेले त्यांचे समर्थक देवडियातील बैठकीला आले नाहीत व प्रदेशाध्यक्षांच्या अभिनंदन प्रस्तावाला समर्थन दर्शविले नाही तर संबंधिताचाही अहवाल प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे.