चतुर्वेदी समर्थकांनी शोधला पटोलेंमध्ये आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:51 AM2018-02-24T00:51:43+5:302018-02-24T00:51:54+5:30
माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना काँग्रेसमधून निष्कासित करण्यात आल्यामुळे त्यांच्या समर्थकांना मोठा हादरा बसला. महापालिकेत विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या कार्यालयात चतुर्वेदी समर्थक नगरसेवक, नेते व कार्यकर्ते जमले. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष झालेल्या माजी खासदार नाना पटोले यांना तेथे निमंत्रित केले. चतुर्वेदी पक्षातून गेल्यामुळे त्यांचे समर्थक पटोलेंमध्ये आधार शोधताना दिसले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना काँग्रेसमधून निष्कासित करण्यात आल्यामुळे त्यांच्या समर्थकांना मोठा हादरा बसला. महापालिकेत विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या कार्यालयात चतुर्वेदी समर्थक नगरसेवक, नेते व कार्यकर्ते जमले. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष झालेल्या माजी खासदार नाना पटोले यांना तेथे निमंत्रित केले. चतुर्वेदी पक्षातून गेल्यामुळे त्यांचे समर्थक पटोलेंमध्ये आधार शोधताना दिसले.
पण पटोले यांनी आपण स्वत:हून नाही तर निमंत्रणावर येथे आल्याचे स्पष्ट करीत गटबाजीपासून स्वत: दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. चतुर्वेदींवरील कारवाईचे वृत्त पसरताच महापालिकेतील काँग्रेसच्या गटात हालचाली सुरू झाल्या. तानाजी वनवे काही वेळासाठी कार्यालय सोडून बाहेर गेले. त्यानंतर परत आल्यावर त्यांनी पटोले येत असल्याचे सांगत पुष्पगुच्छ मागविला. कक्षात वनवे यांच्यासह माजी मंत्री अनिस अहमद, माजी आमदार अशोक धवड, यादवराव देवगडे, नगरसेवक बंटी शेळके, सय्यदा बेगम, दिनेश यादव, यशवंत कुंभलकर यांच्यासह कार्यकर्ते गोळा झाले. पटोले आल्यामुळे चतुर्वेदी समर्थकांचे दडपण कमी झाल्याचे दिसले.
चतुर्वेदींवरील कारवाईची माहिती नाही : पटोले
पटोले यांनी नागपूरच्या गटबाजीच्या विषयापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. चतुर्वेदी यांच्या निष्कासनाबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वीच आपल्यावर पक्षाने जबाबदारी सोपविली आहे. चतुर्वेदींवरील कारवाईची आपल्याला माहिती नाही. नागपुरातून लोकसभा लढण्याच्या प्रश्नावर पक्ष सोपवेल ते काम करू, असेही त्यांनी सांगितले.