अनंता पडाळ
नागपूर : खऱ्या नाेटांसारख्या नाेटा तयार करून त्या लहान मुले खेळण्यासाठी वापरतात. त्यावर ‘चिल्ड्रेन बॅंक’ असा उल्लेख केला जात असून, पूर्वी त्या नाेटांचा आकार खऱ्या नाेटांच्या तुलनेत माेठा असायचा. काहींनी या ‘चिल्ड्रेन बॅंके’च्या नाेटा पाटणसावंगी (ता. सावनेर) येथील दुकानदारांना नकळत देऊन चलनात आणण्याचा प्रयत्न केला आहे. यातून त्या दुकानदाराची फसवणूक झाली आहे.
नागपूर-भाेपाळ राष्ट्रीय महामार्गालगत असलेले पाटणसावंगी हे सावनेर तालुक्यातील माेठे व महत्त्वाचे गाव आहे. या गावात हाॅटेल, दुकाने, पानटपरी यासह व्यापारी प्रतिष्ठानांची संख्याही अधिक आहे. पाटणसावंगी येथे दर मंगळवारी आठवडी बाजार भरत असून, आठवड्यातून तीन दिवस छाेटा गुजरी बाजारही भरताे. मागील काही दिवसात येथील दुकानदारांना काहींनी ‘चिल्ड्रेन बॅंके’च्या नाेटा देऊन साहित्य खरेदी केल्याचे उघड झाले आहे.
आपल्याला २० रुपये, ५० रुपये आणि २०० रुपयांची प्रत्येकी एक नाेट याप्रमाणे ‘चिल्ड्रेन बॅंके’च्या तीन नाेटा प्राप्त झाल्याची माहिती जनरल स्टाेअर्स मालक विनाेद वासाडे व पानटपरी चालक सुनील पांडे यांनी दिली. आठवडी बाजारातील काही भाजीपाला विक्रेत्यांना या ‘चिल्ड्रेन बॅंके’च्या नाेटा प्राप्त झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली असून, नावे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे.
रात्रीची वेळ आणि गर्दीचा फायदा
‘चिल्ड्रेन बॅंके’च्या नाेटा नेमक्या कुणी दिल्या, हे आठवत नसल्याचे दुकानदार सांगतात. या नाेटा घेऊन येणारे रात्रीच्या वेळी आणि दुकानात गर्दी असताना येतात. काही साहित्य खरेदी करतात. दुकानात इतर ग्राहक असल्याने तसेच मनुष्यबळ कमी असल्याने आपण त्या नाेटा निरखून बघितल्या नाही. शिवाय, त्या दिसायला हुबेहूब ओरिजिनल नाेटांसारख्या असल्याने आपण स्वीकारल्या. संबंधिताला त्याने खरेदी केलेल्या साहित्याची किंमत कमी करून उर्वरित रक्कम दिल्याचेही सुनील पांडे यांच्यासह इतर दुकानदारांनी सांगितले.
नाेटांमधील फरक
मूळ आणि ‘चिल्ड्रेन बॅंके’च्या नाेटांचा आकार, चिन्ह, माहिती आणि रंग जवळपास सारखा आहे. त्यात भारतीय रिझर्व्ह बॅंकेऐवजी भारतीय चिल्ड्रेन बॅंक, भारतीय मनाेरंजन बॅंक, पचास रुपयेऐवजी पचास कूपन असा उल्लेख करण्यात आला आहे. या नाेटा पहिल्या बाजूवरून थाेड्याफार ओळखायला येतात. मात्र, दुसऱ्या बाजूवरून ओळखायला थाेडा वेळ लागताे. त्यामुळे संबंधित व्यक्ती या नाेटा दुकानदारांना देताना सहसा दुसरी बाजू वर करून देतात. त्या दाेन्ही नाेटांच्या पेपरचा स्पर्श जवळपास सारखा असल्याचे दुकानदारांनी सांगितले.
या नाेटांवर बंदी घालावी
ज्या दुकानदारांना ‘चिल्ड्रेन बॅंके’च्या नाेटा प्राप्त झाल्या, त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केलेली नाही. असे प्रकार वाढीस लागण्याची तसेच त्यातून दुकानदारांसह इतरांची फसवणूक हाेण्याची शक्यता असल्याने ‘चिल्ड्रेन बॅंके’च्या नाेटा छापण्यावर बंदी घालावी, अशी माहिती दुकानदारांसह काही सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
रात्रीच्यावेळी दुकानात गर्दी असल्यास काही ग्राहक चिल्ड्रेन बॅंकेच्या नाेटा देऊन साहित्य खरेदी करतात. नाेटांचा रंग, आकार आणि त्यावरील विविध बाबींचा उल्लेख जवळपास सारखा असल्याने त्या नाेटा आपल्याला ओळखता आल्या नाही.
- सुनील पांडे, दुकानदार,
पाटणसावंगी, ता. सावनेर
...