मंजितकाैर स्वरंजितसिंग छटवाल (वय ५९) असे पीडित वृद्धेचे नाव आहे. त्या जरीपटक्यातील कडबी चौकात राहतात.
गेल्या वर्षी त्यांना लंडनच्या कथित डॉ. केल्विनची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली होती. मंजितकाैर यांनी ती एक्सेप्ट केल्यानंतर त्यांच्यात ऑनलाईन बातचीत सुरू झाली. आरोपी केल्विन मंजितकाैर यांना आई (मदर) म्हणायचा. त्यामुळे त्यांचाही आरोपीवर विश्वास बसला. डिसेंबर महिन्यात त्याने मंजितकाैर यांना लंडनहून गिफ्ट पाठवीत असल्याचे सांगितले. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री त्यांना एक फोन आला. स्वत:चे नाव जयश्री यू सांगणाऱ्या या महिलेने आपण दिल्ली विमानतळावर कस्टम ऑफिसर असल्याचे सांगितले. तुमचे लंडनहून गिफ्ट आले आहे. ते सोडविण्यासाठी तुम्हाला कस्टम ड्युटी भरावी लागेल, अशी बतावणी करून मंजितकाैर यांना २ लाख ९५ हजार रुपये जमा करण्यास बाध्य केले. आरोपी वेगवेगळे कारण सांगून पुन्हा पुन्हा पैसे भरण्यास सांगत असल्याने मंजितकाैर यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी रक्कम भरण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपी केल्विन आणि जयश्रीने त्यांच्याशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मंजितकाैर यांनी जरीपटका पोलिसांकडे तक्रार नोंदवली. हवालदार राष्ट्रपाल खोब्रागडे यांनी बुधवारी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
----