लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : टपाल खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अनेक बेरोजगारांना लाखोंचा गंडा घालणारा ठगबाज नागसेन वेल्लोर (रा. उज्ज्वलनगर, कामठी) तसेच त्याची साथीदार कविता वाघमारे (रा. ओमकारनगर) या दोघांविरुद्ध धंतोली पोलीस ठाण्यात अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.आपली टपाल खात्यात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ओळख असून, त्या आधारे आपण पोस्ट आॅफिसमध्ये नोकरी लावून देतो, अशी थाप वेल्लोर मारायचा. नोकरीच्या बदल्यात तो कुणाला दोन, कुणाला तीन तर कुणाला पाच लाख रुपये मागायचा. त्याने अशा प्रकारे अनेक बेरोजगारांना लाखोंचा गंडा घातला होता. जाळ्यात अडकलेल्या बेरोजगाराकडून रक्कम घेतल्यानंतर तो टपाल खात्याचे बनावट ओळखपत्र तसेच अनुभवाचे प्रमाणपत्र देऊन बेरोजगारांची बोळवण करीत होता. नोकरीचा तगादा लावणाºयांना तो बनावट नियुक्तीपत्रही द्यायचा. त्याच्या या फसवणुकीत त्याची साथीदार कविता वाघमारेही होती. ती देखील बेरोजगारांना खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करायची आणि त्यांच्याकडून पैसे उकळायची. रामेश्वरीतील रजनी राणाप्रताप दहाट (वय ३८) यांनाही नागसेन आणि कविताने अशाच थापा मारून त्यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले होते. १ जूनला रक्कम घेतल्यानंतर नोकरी लावून देण्यासाठी मात्र आरोपी टाळाटाळ करायचे. त्यांचा संशय आल्यामुळे दहाट यांनी आरोपींनी दिलेल्या नियुक्तीपत्राची शहानिशा केल्यानंतर ते बनावट असल्याचे त्यांना कळले. त्यमुळे दहाट यांनी आरोपींना आपली रक्कम परत मागितली. मात्र, रक्कम देण्यासही ते टाळाटाळ करू लागले. त्यांनी फसवणूक केल्याची खात्री पटल्यामुळे रजनी दहाट यांनी धंतोली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी रविवारी या प्रकरणात ठगबाज वेल्लोर आणि त्याची साथीदार वाघमारेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर कुणालाही अटक झालेली नव्हती.हॉटेलमध्ये अड्डा, पोलिसांचे दुर्लक्ष!ठगबाज वेल्लोर याने नागपूरसह गावोगावच्या बेरोजगारांची फसवणूक केली आहे. त्याने धंतोली पोलीस ठाण्यातील काही जणांशी मधूर संबंध असल्यामुळे ठाण्याजवळच्या एका हॉटेलला आपल्या बनवाबनवीचा अड्डा बनविला होता. धंतोली पोलिसांकडून कारवाई होणार नाही, अशी त्याला खात्री होती. तेथे तो नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन लाखोंची रोकड पीडित बेरोजगारांकडून घ्यायचा. विशेष म्हणजे, हाकेच्या अंतरावर बनवाबनवी चालत असूनही धंतोली पोलीस त्याकडे लक्ष देत नव्हते. मात्र, या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते आणि वरिष्ठ पोलीस अधिकाºयांकडून रेटा आल्याने अखेर धंतोली पोलिसांनी रविवारी या प्रकरणात गुन्हा दाखल केला.
नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना लाखोंचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 1:20 AM
टपाल खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अनेक बेरोजगारांना लाखोंचा गंडा घालणारा ठगबाज नागसेन वेल्लोर (रा. उज्ज्वलनगर, कामठी) तसेच त्याची साथीदार कविता वाघमारे (रा. ओमकारनगर) या दोघांविरुद्ध धंतोली पोलीस ठाण्यात अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
ठळक मुद्देठगबाज वेल्लोरसह दोघांवर गुन्हा दाखल