लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - लठ्ठ पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगाराने सदरमधील एका उच्चशिक्षित तरुणीचे दीड लाख रुपये हडपले. २० जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान घडलेल्या या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर बुधवारी सदर पोलिसांनी या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
मायरा मॉलकम भामगारा (वय २७) ही सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिने एमबीएपर्यंतचे शिक्षण घेेतल्याचे पोलीस सांगतात. मायराने चांगली नोकरी मिळविण्यासाठी आपला बायोडाटा तसेच अप्लीकेशन मास्टर डॉट कॉम या पोर्टलवर अपलोड केले होते. २० जानेवारीला सायबर गुन्हेगाराने मायराला फोन करून टाटा पॉवर या प्रतिष्ठित कंपनीत महिन्याला ८० हजार ते लाख रुपये महिन्याची नोकरी मिळेल, असे सांगितले. इंटरव्ह्यू फी, व्हेरीफिकेशन, जॉब बॉन्ड आणि ॲडमिशन फीच्या नावाखाली वेगवेगळ्या दिवशी मायराकडून एकूण १ लाख ५४ हजार २९१ रुपये उकळले. त्याने सांगितल्याप्रमाणे मायरा ही रक्कम जमा करीत होती. तर तो प्रत्येक वेळी वेगवेगळी सबब सांगून रक्कम मागत होता. मायराला शेवटी संशय आला. त्यामुळे तिने अधिक पैसे जमा करण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपीने तिच्याशी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने मायराने सदर पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पीएसआय कृष्णा पुल्लेवार यांनी चाैकशी करून फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला.
---