लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दीड वर्षांत दुप्पट रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवून ‘गेन बिट कॉईन’ कंपनीच्या नावाआड अनेकांना लाखोंचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी रविवारी जरीपटक्यातील शैलेंद्र बाबूराव वानखेडे (वय ४०) यांची तक्रार नोंदवून घेत गणेशपेठ ठाण्यात आरोपी अमित भारद्वाज, इंद्रजित बोरा आणि हेमंत सूर्यवंशी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.फसवणुकीसाठी आरोपी भारद्वाज, बोरा आणि सूर्यवंशी या तिघांनी गेन बिट कॉईन नामक कंपनीची फेसबुकवर जाहिरात केली होती. मार्च, एप्रिल २०१७ मध्ये त्यांनी सीताबर्डीतील हिंदी साहित्य संघात आणि गणेशपेठमधील एका हॉटेलमध्ये आरोपींनी सेमिनारचे आयोजन केले होते. त्यात सहभागी झालेल्यांना बीट कॉईनच्या खरेदीच्या माध्यमातून आपल्या कंपनीत रक्कम गुंतवल्यास दीड वर्षांत रक्कम दुप्पट होते, अशी थाप मारली. सर्व व्यवहार पारदर्शी आहेत, आॅनलाईन नोंदी तुम्ही कुठूनही बघू शकता, असे सांगून आरोपींनी लोकांना विश्वासात घेतले होते. आरोपींच्या थापेबाजीला बळी पडून वानखेडे आणि त्यांच्यासारख्याच अनेकांनी २० नोव्हेंबर २०१६ पासून बीट कॉईन खरेदी करून आपली लाखोंची रक्कम गुंतवली. प्रारंभी आॅनलाईन (संकेतस्थळावर) त्यांची रक्कम वाढत असल्याच्या खोट्या नोंदी करून आरोपींनी बनाव केला. आपली रक्कम दामदुप्पट झाल्यामुळे ती परत मागण्यासाठी अनेकांनी तगादा लावल्यानंतर आरोपींनी ते संकेतस्थळ बंद केले. फोनवरूनही आरोपींनी रक्कम परत करण्यासाठी टाळाटाळ सुरू केली. तब्बल ८ लाख ७९ हजार ५५० रुपयांची रक्कम थकीत झाल्याने वानखेडे आणि अन्य पाच जणांनी आरोपींमागे पैशासाठी तगादा लावला असता, आरोपींनी रक्कम गुंतविणाऱ्यांना प्रतिसाद देणे बंद केले. त्यामुळे वानखेडेंसह सहा जणांनी पोलिसांकडे धाव घेतली. प्रकरणाची व्याप्ती बघता, गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाकडे या प्रकरणाची चौकशी सोपविण्यात आली. त्यानंतर ५ आॅगस्टला वानखेडेंची गणेशपेठ ठाण्यात तक्रार नोंदवून घेत गुन्हा दाखल करण्यात आला.फसवेगिरीचा आकडा वाढणारप्राथमिक चौकशीत फसवणूक झालेल्यांची संख्या केवळ सहा आणि रक्कमेचा आकडा पावणेनऊ लाखांचा असला तरी हा आकडा कितीतरी पट जास्त आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे पीडित व्यक्ती पोलिसांकडे तक्रार करण्यास कचरतात. मात्र,आता गुन्हाच दाखल झाल्यामुळे तक्रारदारांची संख्या झपाट्याने वाढण्याचे संकेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या फसवेगिरी प्रकरणाचा सूत्रधार भारद्वाज असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वी पुणे आणि अन्य ठिकाणी अनेक गुन्हे दाखल असल्याचे समजते.दुसरे म्हणजे, बिट कॉईन अथवा अशाचप्रकारे वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावाने अल्पावधीत रक्कम दुप्पट, तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवणारे अनेक भामटे शहरात सक्रिय आहेत. आर्थिक व्यवहाराचे मृगजळ निर्माण करणाºया या समाजकंटकांनी अशाप्रकारे अनेकांची फसवणूक केली असून तसे गुन्हेही यापूर्वी दाखल झाले आहेत.