लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सालेकसा (जि. गोंदिया) येथील अनुसूचित जाती-जमाती ग्रामीण कला विकास संस्थेच्या संचालकांनी नोकरीचे आमिष दाखवून ३०० पेक्षा जास्त बेरोजगार युवकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. फसगत झालेल्या युवक-युवतींनी शनिवारी सायंकाळी सीताबर्डी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरुद्ध तक्रार नोंदवली. शशीकपूर जोहरलाल मडावी (वय २९, रा. सालेकसा, जि. गोंदिया) आणि श्रीकांत तारकेश पारधी (वय २३, रा. मालडोंगरी, ब्रम्हपुरी) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनी अनुसूचित जाती-जमाती ग्रामीण कला विकास संस्थेच्या वतीने जानेवारी २०१७ मध्ये वृत्तपत्रात जाहिरात दिली होती. सरकारसोबत झालेल्या करारानुसार आम्ही जिल्हा संयोजक, तालुका समन्वय आणि ग्रामस्तरावर सेवक चांगल्या पगारावर नियुक्त करणार असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यावरून गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यासह ठिकठिकाणच्या बेरोजगारांनी संस्थेकडे अर्ज केले. प्रत्येक अर्जदाराकडून ३,७०० रुपये नोंदणी शुल्क घेतले. त्यानंतर सुमारे ३०० युवक युवतींची लेखी परीक्षा, मुलाखत घेतल्यानंतर सर्व उमेदवारांना नागपुरातील विदर्भ हिंदी साहित्य सभागृहात तीन दिवसीय प्रशिक्षणासाठी बोलविण्यात आले. तीन दिवसांपासून सीताबडीर्तील सभागृहात प्रशिक्षण देण्यात आल्यानंतर उपस्थित उमेदवारांना त्यांनी त्यांना शेतकऱ्यांकडून १०० रुपये घेऊन नोंदणी करायची आहे. पुढे त्यांना शासनाकडून सवलतीच्या दरात बी, बियाणे, रासायनिक खते, औषधे आणि शेतीउपयोगी वस्तू देण्याची योजना समजावून सांगण्यास सांगितले. शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा डाव या सर्व प्रकारातून संस्थाचालकांची बनवेगिरी उमेदवारांच्या लक्षात आली. त्यांनी शेतकऱ्यांच्या फसवणुकीचाही डाव मांडल्याचे लक्षात आल्याने उमेदवारांनी या कामाला नकार देऊन आपले पैसे परत मागितले. आयोजकांनी त्यांना पैसे परत देण्यास नकार दिल्यामुळे सर्वच्या सर्व उमेदवार शनिवारी सायंकाळी सीताबर्डी पोलीस ठाण्यात पोहचले. महेंद्रकुमार नेपालजी क्षीरसागर (वय २६, रा. शेंदुरवाफा, ता. साकोली) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध बेरोजगारांकडून सुमारे १४ लाख रुपये हडपण्याच्या आरोपावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
नोकरीच्या नावाखाली फसवणूक
By admin | Published: May 22, 2017 2:01 AM