लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिव्यांग व्यक्तीला पूर्ण बरे करण्याचे आमिष दाखवून गंडेदोरे करीत भस्म पावडर देऊन पावणेदोन लाख रुपये हडपणाऱ्या टोळीतील पुन्हा एका आरोपीला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली. सुनील सायवान (वय २७, रा. खरबी) असे त्याचे नाव आहे.फिर्यादी भारत पंजाबराव अढाव (वय ४९) हे अध्यापकनगरात शुभप्रभात अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचा आठ वर्षीय मुलगा दिव्यांग आहे. महिनाभराच्या उपचारात तुमच्या मुलाला पूर्णपणे ठीक करून देतो, असा दावा करून आरोपी राजू ठाकूर (वय २४, रा. अमरावती), मनोज जाधव (वय २५), विजय जाधव (वय २४) आणि बालाजी फार्मसीत काम करणारा सुनील सायवान (बैद्यनाथ चौक) या चौघांनी अढाव यांच्याकडून १ लाख ७२ हजार ४०० रुपये हडपले होते. मुलगा बरा होईल, या कल्पनेने हुरळलेल्या अढाव यांनी १२ जूनपासून रक्कम दिली तर आरोपींनी अढाव यांना स्वर्णभस्मच्या नावाखाली भस्म, पावडर, गंडेदोरे दिले. आरोपींनी दिलेल्या औषधाने अढाव यांच्या मुलाला कसलाच फायदा झाला नाही. उलट आरोपी सारखी पैशाची मागणी करीत होते. आरोपींनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे अढाव यांनी आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने आरोपींना शनिवारी रात्री बोलावले. पैसे मिळतील म्हणून आरोपी राजू ठाकूर आला. त्याची धुलाई करीत अढाव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला हुडकेश्वर पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी रविवारी पहाटे राजूला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपी सुनीलला अटक केली. अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.
औषधोपचाराच्या नावाखाली फसवणूक करणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:31 AM
दिव्यांग व्यक्तीला पूर्ण बरे करण्याचे आमिष दाखवून गंडेदोरे करीत भस्म पावडर देऊन पावणेदोन लाख रुपये हडपणाऱ्या टोळीतील पुन्हा एका आरोपीला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली. सुनील सायवान (वय २७, रा. खरबी) असे त्याचे नाव आहे.
ठळक मुद्देटोळीतील आरोपी फरार : पोलिसांचा शोध सुरू