लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : थायलंडच्या यात्रेवर घेऊन जाण्याचे आमिष दाखवून सव्वातीन लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. फसवणूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स एजंटविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.अनिल देशमुख ऊर्फ शांतनू बालकृष्ण वाघ (३०) रा. दहेगाव, खापरखेडा आणि पंकज पाल (३४) रा. बैलवाडी, कोराडी अशी आरोपींची नावे आहेत. बोनवाईज हॉलिडेज नावाने आरोपी फर्म चालवतात. त्यांनी ‘बिझनेस टू बिझनेस’ या योजनेंतर्गत मनीषनगर येथील रहिवासी शक्ती निर्मल यांच्याकडील १२ लोकांसोबत थायलंड यात्रेवर नेण्याचा करार केला. आरोपींनी पाच दिवस व सहा रात्र असा (४ आॅगस्ट ते ११ आॅगस्ट) पॅकेज टूर तयार केला. यासाठी वेळोवेळी ३ लाख २० हजार रुपये घेतले. टूरवर जाण्याची तारीख जवळ आल्यावरही आरोपी यात्रेसंबधी कुठलेही दस्तावेज देत नव्हते किंवा माहितीही देण्यास टाळाटाळ करीत होते. तेव्हा निर्मल यांनी आरोपींना पैसे परत करण्यास सांगितले. परंतु आरोपी पैसे परत करण्यासही टाळाटाळ करीत होते. अखेर अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नागपुरात थायलंड टूरच्या नावावर फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 8:15 PM
थायलंडच्या यात्रेवर घेऊन जाण्याचे आमिष दाखवून सव्वातीन लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. फसवणूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स एजंटविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देबारा जणांना घातला गंडा : बोनवाईज हॉलिडेजचे कृत्य