नागपूर : कुटुंबासह अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेला नागपुरात गुंतवणुकीची बतावणी करून तिच्या पतीच्या मावस बहीण व तिच्या दिराने ९९ लाख ४९ हजार रुपयांनी गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे.
नीलेश ज्ञानेश्वर गायकवाड (वय ३०, रा. मिलिंदनगर) आणि डॉ. मधुलिका बागडे (२८, रा. नागभूमी सोसायटी, मिसाळ ले आऊट) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी महिला मूळची सोमवारी क्वार्टर सक्करदरा येथील रहिवासी डॉ. पल्लवी जयवंत चोपडे (वय ४०) ही आहे. वर्ष २००८ मध्ये नितीन बनसोड यांच्यासोबत विवाह झाल्यामुळे पल्लवी पतीसोबत अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहते. डॉ. पल्लीवीची सासू गीता बनसोड सोमवारी क्वार्टरमध्ये राहतात. आरोपी डॉ. मधुलिका बागडे आणि नीलेश गायकवाड यांनी नागपुरात एहसास नावाची संस्था चालवित असल्याचे डॉ. पल्लवीला सांगितले.
एप्रिल २०१९ मध्ये अमेरिकेहून नागपूरला आल्यावर डॉ. पल्लवीची मधुलिकाने नीलेशसोबत पाचपावलीच्या एका हॉटेलमध्ये ओळख करून दिली होती. नीलेशने डॉ. पल्लवीला फार्मा सेक्टरमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा होत असल्याचे सांगितले. त्यानंतर जरीपटका भागातील प्रसन्ना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल अँड पॅरामेडिकल सायन्सच्या नावाने इन्स्टिट्यूट सुरू करण्यासाठी आणि नंदनवनमध्ये फार्मसी खरेदी करण्याच्या बहाण्याने वेळोवेळी ९९ लाख ४९ हजार रुपये घेतले होते. त्याची चौकशी केली असता, नीलेशने खोटे सांगून फसविल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पल्लवीच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी विविध कलमांनुसार आरोपी मधुलिका व नीलेशविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
............