लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनचे संचालक सुनील मिश्रा यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी मिश्रा यांना बुधवारी अटक केली. या घडामोडीमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.बैद्यनाथ चौकाजवळ मिश्रा यांचे सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशन कॉलेज आहे. या महाविद्यालयाच्या माध्यमातून मिश्रा तेथे विविध अभ्यासक्रम चालवितात. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. मात्र, प्रवेश घेतल्यापासूनच विद्यार्थ्यांना त्रास सुरु झाला. महाविद्यालयात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी नव्हते. परीक्षा शुल्क जमा केल्यानंतरही विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यात आले नाही. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे याबाबत तक्रार केली. विद्यापीठाने मिश्रा यांना २०१७-१८ च्या शैक्षणिक सत्राला काही अटीअंतर्गत मंजुरी दिली होती. त्यांनी या अटींचे पालन केले नसल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले होते. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना आपले मूळ दस्तावेज कॉलेजमध्ये जमा केले हे. त्यांनी मिश्रा यांना दस्तावेज परत मागितले. मात्र, वारंवार मागणी करूनही मिश्रांनी विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे परत केली नाही. त्यामुळे अनेकांचे नुकसान झाले. परिणामी त्रस्त झालेल्या अश्विनी रंगारीसह आठ विद्यार्थ्यांनी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.चौकशीअंती गुन्हा दाखल करून बुधवारी मीरे ले-आऊट येथील घरून पोलिसांनी मिश्रांना अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा तीन दिवसांचा पीसीआर मिळवला.तक्रारीसाठी समोर या : पोलिसांचे आवाहनविविध प्रकरणांच्या माध्यमातून मिश्रा यांनी काही दिवसांपासून विद्यापीठाचे कुलगुरूंसह अनेकांना अडचणीत आणले होते. या संबंधाने न्यायालयात अनेक प्रकरणे सुरु आहेत. मिश्रा यांनी पोलिसांना मारहाण करून विद्यापीठाच्या चमूला हुसकावून लावण्याचेही प्रकरण ताजेच आहे. पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने या प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडे कुलगुरू डॉ. काणे यांनी तक्रारही केली होती. आता त्यांना एकदाची अटक झाल्याने अनेक प्रकरणांचा तपास अन् पुढच्या कारवाईला वेग मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे, पोलिसांनी आज दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात मिश्रांकडून फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांनी पोलिसांसोबत संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
विद्यार्थ्यांची फसवणूक : सुनील मिश्रांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 1:14 AM
सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनचे संचालक सुनील मिश्रा यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी मिश्रा यांना बुधवारी अटक केली. या घडामोडीमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्देशैक्षणिक वर्तुळात खळबळ