लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : माैदा तालुक्यात धानाची राेवणी व साेयाबीनची पेरणी माेठ्या प्रमाणात केली जाते. पेरणी केल्यानंतर बियाणे व्यवस्थित व पूर्ण क्षमतेने उगवले नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढवते व आर्थिक नुकसान हाेते. ते टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी धान व साेयाबीनच्या बियाण्यांची उगवणशक्ती तपासून बघावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संदीप नाकाडे यांनी केले. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चारभा येथील कार्यक्रमात बियाण्यांची उगवणशक्ती कशी तपासायची, हे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले.
कृषी सहायक संदीप देशमुख यांनी उगवणशक्ती तपासण्याची पद्धती समजावून सांगितली. सुती पोते किंवा चौकोनी कापड किंवा वर्तमानपत्र (एकावर एक पाच वर्तमानपत्र) यापैकी कोणतीही एक वस्तू घेतल्यास ती पूर्णपणे पाण्यात भिजवून घ्यावी. त्यानंतर ती व्यवस्थितपणे जमिनीवर अंथरुण ठेवावी. त्यावर विशिष्ट पद्धतीप्रमाणे प्रत्येक ओळीमध्ये १०-१० बिया ठेवून १०-१० रांगा तयार कराव्या. नंतर सदर पोते/वर्तमानपत्र/सुती कापड गोलाकार गुंडाळून घ्यावे. गुंडाळताना आतील बिया हलणार नाहीत याची दक्षता घ्यावी. गुंडाळलेले पोते/वर्तमानपत्र/सुती कापड सुतळीने बांधावे. तीन ते चार दिवस जेथे जास्त उजेड येणार नाही, अशा ठिकाणी सावलीत ते ठेवून त्यावर दिवसातून ३-४ वेळा हलकेसे पाणी शिंपडावे.
तीन ते चार दिवसांनी उगवण झालेली एक एक रांग मोजून घ्यावी. १०० पैकी किती बियाणे मोड आलेले आहेत, यातील सुदृढ व निरोगी बियाणे मोजून घ्यावे, असेही संदीप देशमुख यांनी सांगितले. यावेळी चक्रधर गभणे, कृषी पर्यवेक्षक एस. सातपुते, रवी राठोड, राजेंद्र चौधरी, सागर चौधरी, रमेश बरबटे, शंकर पटिये, जागेश्वर गडे, शंकर गडे यांच्यासह स्थानिक व परिसरातील गावांमधील शेतकरी उपस्थित होते.
...
पेरणीसाठी किती बियाणे वापरावे?
१०० बियांपैकी किमान ७० बिया सुदृढ व निकाेप उगवल्यास ते बियाणे पेरणीयाेग्य असून, त्याची उगवणशक्ती ७० टक्के असल्याचे ग्राह्य धरावे. किमान ७० ते ८० टक्के उगवणशक्ती असलेले बियाणे पेरणीसाठी प्रति एकर ३० किलाे वापरावे. ही उगवणशक्ती ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास प्रत्येकी एक टक्का उगवणशक्ती कमी याप्रमाणे एकरी अर्धा किलाे बियाणे वाढवावे. अर्थात ६९ टक्के उगवणशक्ती असलेले बियाणे एकरी ३०.५ किलाे वापरावे. ६८ टक्के असल्यास ३१ किलाे बियाणे वापरावे. उगवणशक्ती ६० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असल्यास ते बियाणे पेरणीसाठी वापरू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संदीप नाकाडे यांनी केले.